मुलाच्या निष्काळजीपणाचा कळस; आजारी आईला घरात बंद करून फिरायला गेला मुलगा; ज्येष्ठ महिलेचा तहान-भुकेने तडफडून मृत्यू

भोपाळ : घरातल्या वृद्धांना त्यांच्या मुलांकड़ून क्रूर वागणूक दिली जात असल्याच्या अनेक घटना घडताना पाहायला मिळतात. काही वृद्ध व्यक्ती वृद्धाश्रमाचाही पर्याय स्वीकारतात. पण या सर्व निष्ठुरतेच्या पलीकडे जाणारे भयंकर वर्तन एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईबाबत केल्याची घटना उत्तर प्रदेशच्या भोपाळमध्ये समोर आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 24 Dec 2024
  • 06:36 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

भोपाळ : घरातल्या वृद्धांना त्यांच्या मुलांकड़ून क्रूर वागणूक दिली जात असल्याच्या अनेक घटना घडताना पाहायला मिळतात. काही वृद्ध व्यक्ती वृद्धाश्रमाचाही पर्याय स्वीकारतात. पण या सर्व निष्ठुरतेच्या पलीकडे जाणारे भयंकर वर्तन एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईबाबत केल्याची घटना उत्तर प्रदेशच्या भोपाळमध्ये समोर आली आहे. आपल्या ८० वर्षांच्या वृद्ध व आजारपणामुळे अंथरुणाला खिळलेल्या जन्मदात्या आईला घरात बंद करून मुलगा थेट फिरायला निघून गेला. त्यामुळे आईचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८० वर्षांच्या ललिता दुबे मुलगा अरुणसोबत भोपाळच्या निशातपुरा भागामध्ये राहात होत्या. पण या दुर्दैवी घटनेच्या दिवशी अरुण त्याच्या कुटुंबाबरोबर उज्जैनला फिरायला निघून गेला. जाताना त्याने घराला बाहेरून कुलूप लावले. ललिता दुबे या वृद्धापकाळातील आजारपणामुळे अंथरुणाला खिळून होत्या. त्यामुळे त्यांना जागेवरून उठणे अशक्य झाले होते. उज्जैनला गेल्यानंतर अरुणने इंदूरमध्ये राहणाऱ्या भावाला अजयला फोन करून

आपण बाहेर फिरायला आल्याचे सांगितले.  हा सगळा प्रकार समजल्यानंतर अजयने भोपाळमध्ये त्याच्या मित्राला फोन केला आणि ललिता दुबे यांच्या घरी जाऊन माहिती घेण्यास सांगितले. त्याचा मित्र जेव्हा भोपाळमधील घरी पोहोचला, तेव्हा ललिता दुबे यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच भोपाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ललिता दुबे यांचा मृतदेह तातडीने शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तपासणीच्या अहवालात ललिता दुबे यांचा मृत्यू अतीउपासमार आणि तहान न भागल्यामुळे झाल्याचे समोर आले.

अजयच्या तक्रारीवरून अरुणविरोधात भादंवि कलम १०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ललिता दुबे यांना त्यांच्या आजारपणामुळे अंथरुणावरून उठणे  अशक्य होते. त्यामुळे त्यांना जवळपास २४ तास पाणी पिता आले नाही. काही खाण्यासाठी किंवा औषधे घेण्यासाठीही त्यांना उठता आले नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू ओढवल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest