संग्रहित छायाचित्र
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी नेहमी चर्चेत असते. सध्या ती चित्रपटांमध्ये फारशी दिसत नसली, तरी तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र, यावेळी ती तिच्या फोटोंमुळे नव्हे तर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. छत्तीसगड सरकारच्या 'महतारी वंदन योजने'ची लाभार्थी म्हणून तिचं नाव समोर आल्याने खळबळ माजली आहे.
छत्तीसगड सरकारची 'महतारी वंदन योजना' ही आर्थिकदृष्ट्या कमकुवत विवाहीत महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थ्यांना 1000 रुपये दिले जातात. मात्र, अभिनेत्री सनी लिओनीचं नाव या योजनेत लाभार्थी म्हणून समोर आलं, ज्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
तपासादरम्यान समोर आलं की, सनी लिओनीच्या नावाने बनावट खाते उघडून त्या खात्यात या योजनेचे पैसे पाठवण्यात आले होते. यामध्ये लाभार्थी म्हणून सनी लिओनी आणि तिच्या पतीचं नाव जॉनी सिन्स दाखवण्यात आलं आहे. या संदर्भातील अर्ज बस्तर जिल्ह्यातील तलूर गावातील अंगणवाडी स्तरावर नोंदवण्यात आला होता. ही बाब निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी हरिस एस यांनी तपासाचे आदेश दिले. महिला व बालविकास विभागाने या प्रकरणी वसुली आणि एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. वीरेंद्र जोशी नावाच्या व्यक्तीने बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक केल्याचं उघड झालं असून, त्याचं बँक अकाऊंट होल्ड करण्यात आलं आहे. त्याने अंगणवाडीमार्फत अर्ज केला होता.
या प्रकरणामुळे योजनेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार असून, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. खरं तर सनी लिओनीचा या संपूर्ण प्रकरणाशी कोणताही थेट संबंध नाही. मात्र, तिच्या नावाचा गैरवापर झाल्याने हे प्रकरण चर्चेत आलं आहे.
महतारी वंदन योजना
छत्तीसगड सरकारने 2024 मध्ये महतारी वंदन योजना सुरू केली. या योजनेचे उद्दिष्ट आर्थिकदृष्ट्या कमकुवत विवाहित महिलांना दरमहा 1,000 रुपयांची आर्थिक मदत करणे आहे. प्रत्येक महिन्याला ही मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाते. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी महिलेला छत्तीसगडमधील रहिवासी असणे गरजेचे आहे. तसेच ती 21 वर्षांपेक्षा जास्त वयाची असावी, दारिद्र्यरेषेखाली असावी, आणि तिच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा. या सर्व अटी पूर्ण करणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ दिला जातो.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.