संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून बंगळुरूतील अतुल सुभाष यांच्या आत्महत्येचे प्रकरण देशभरात चर्चेत आहे. तंत्रज्ञ अतुल सुभाष यांनी पत्नी आणि सासरच्या लोकांवर गंभीर आरोप करत जीवन संपवले होते. त्यांनी आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ आणि २४ पानांचे पत्र लिहून पत्नी आणि सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले होते.
त्यानंतर पोलिसांनी अतुल सुभाष यांची पत्नी, सासू आणि मेहुण्याला अटक केली आहे. त्यानंतर आता अतुल सुभाष यांच्या आईने सर्वोच्च न्यायालयात ३ वर्षांच्या नातवाचा ताबा मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती. या प्रकरणी सुनावणी घेत सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक, हरियाणा आणि उत्तर प्रदेश सरकारला नोटीस बजावली आहे.
न्यायमूर्ती बी. व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती एन कोटीश्वर सिंग यांच्या खंडपीठाने कर्नाटक, हरियाणा आणि उत्तर प्रदेश सरकारला नोटीस बजावत या संपूर्ण परिस्थितीची माहिती मागवली आहे. या प्रकरणी आता ७ जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
अतुल सुभाष यांच्या आईने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत त्यांच्या साडेचार वर्षांच्या नातवाचा ताबा मागितला आहे. सध्या अतुल सुभाष यांचा मुलगा कुठे आहे याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे, त्यांच्या आईन याचिकेत म्हटले आहे. याचबरोबर अतुल यांची पत्नी आणि सासरचे लोक, अतुल यांच्या मुलाची माहिती देत नसल्याचेही याचिकेत म्हटले आहे.
दरम्यान निकिताने, त्यांच्या मुलाला फरिदाबादमधील बोर्डिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला असून, तो तिचे काका सुशील सिंघानिया यांच्या ताब्यात असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. मात्र, सुशील सिंघानिया यांनी मुलाबाबत त्यांना कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.