संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात न्यायदेवतेची नवीन मूर्ती लावली गेली आहे. न्यायाधीशांच्या लायब्ररीमध्ये लावण्यात आलेल्या नव्या मूर्तीचे वैशिष्ट्य आहे की, या मूर्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली नाही. आधीप्रमाणेच या मूर्तीच्या हातात तराजू आहे, मात्र दुसऱ्या हातात तलवारीच्या जागी भारताचे संविधान आहे.
प्रतीकात्मक दृष्टीने पाहिले तर काही महिन्यांपूर्वी बसवण्यात आलेला न्यायदेवतेचा नवीन पुतळा हा न्याय आंधळा नसतो, असा स्पष्ट संदेश देत असल्याचे सांगितले जात आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या पुढाकाराने हा पुतळा बसवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र असे पुतळे कोर्टरूममध्ये तसेच आणखी काही ठिकाणी बसवणार की नाही, हे काही स्पष्ट झालेले नाही. ब्रिटिशांच्या काळात भारतीय न्यायव्यवस्थेतील बहुतांश कायदे रोमन संस्कृतीतील प्रतीकांच्या आधारे तयार करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून डोळ्यावर पट्टी आणि हातात तराजू आणि तलवार असणारी रोमन पोशाखातील न्यायदेवता 'लेडी जस्टिशिया'ची मूर्ती भारताची न्यायदेवता म्हणून स्वीकारण्यात आली. आज सरन्यायधीश धनजंय चंद्रचूड यांनी या न्यायदेवतेचा चेहरा मोहोराच पालटून टाकला आहे. नवी न्यायदेवता भारतीय पोषखात आहे. तिच्या गळ्यामध्ये भारतीय दागिने आहेत. तिची केशभूषादेखील भारतीय करण्यात आली आहे. शिवाय न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढून टाकण्यात आली आहे. या निर्णयातून 'अंधा कानून' नाही, हा संदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
सरन्यायाधीशांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण इंग्रजांच्या वारशातून पुढे गेले पाहिजे, असे चंद्रचूड यांचे मत आहे. ते सर्वांना समान लेखतात. त्यामुळे न्यायदेवतेचे स्वरूप बदलण्यात यावे. देवीच्या हातामध्ये तलवार नाही तर संविधान हवे. त्यामुळे समाजात संविधानाच्या हवाल्याने न्याय देण्यात येतो हा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल. न्यायदेवतेच्या हातामधील तलवार हे हिंसेचे प्रतीक होते. न्यायदेवता ही वास्तविक यूनानमधील प्राचीन देवी आहे. तिला न्यायाचं प्रतीक मानले जाते. तिचे नाव जस्टिशिया आहे. त्याच नावापासून जस्टीस हा शब्द तयार झाला. या देवीच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते. त्याचा देखील खास अर्थ होता. न्यायदेवता नेहमी निष्पक्ष न्याय करेल हा त्याचा अर्थ होतो. कुणाला पाहिल्यानंतर न्याय एका पक्षाकडे झुकू शकतो. त्यामुळे या देवतेनं डोळ्यांना पट्टी बांधली आहे.
न्यायदेवतेच्या नव्या पुतळ्याचे वैशिष्ट्य काय?
न्यायदेवतेच्या या नव्या पुतळ्याचा रंग पूर्णपणे पांढरा आहे. पुतळ्यामध्ये न्यायदेवतेचे भारतीय पोशाखात चित्रण करण्यात आले आहे. न्यायदेवतने साडी परिधान केल्याचे सांगितले आहे. डोक्यावर मुकुट आहे. कपाळावर टिकली, कानात आणि गळ्यात पारंपरिक दागिनेही दिसतात. न्यायदेवतेच्या एका हातात तराजू आहे. दुसऱ्या हातात संविधान धरलेले दाखवले आहे. न्यायदेवता फैसला देण्यासाठी प्रकरणातील पुरावे व तथ्यांची तुला करते. तलवारीचा अर्थ आहे की, न्याय तेज आणि अंतिम असेल.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.