संग्रहित छायाचित्र
लखनौ; उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बुलंदशहरमध्ये खुर्चीवर बसण्यावरून असा वाद झाला की, प्रकरण लग्न मोडण्यापर्यंत आणि घटस्फोटापर्यंत (Divorce) पोहोचले. दिल्लीतील सीमापुरी येथून मुलाकडील मंडळी लग्नाचे एक वऱ्हाड घेऊन बुलंदशहरला पोहोचले होते. हा विवाह होता होता पाडल्याचे समोर आले आहे.
शनिवारी (२७ जानेवारी) रात्री आठच्या सुमारास मौलवीसमोर निकाह पार पडला, त्यानंतर दोन्ही बाजूच्या लोकांनी वधू-वरांवर पुष्पवृष्टी करून आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, रात्री साडेदहाच्या सुमारास वराची ७० वर्षीय आजी लग्नमंडपात खुर्चीवर बसली होती. त्याचवेळी वधू पक्षातील तरुण आला व त्याने आजीला खुर्चीवरून उठण्याचा आग्रह धरला. खुर्चीवरून उठण्यासाठी तरुणाने वृद्ध महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावरून तेथे वादावादी सुरू झाली आणि हळूहळू हे प्रकरण वधू-वरांपर्यंत पोहोचले. यानंतर लग्नमंडपात एकच गोंधळ उडाला, संतापलेल्या वर आणि त्याच्या भावाने मुलीकडच्यांना शिवीगाळ करत जिवे मारण्याच्या धमक्या देण्यास सुरुवात केली. त्यामुळे वधू पक्षातील लोकही संतापले. यावेळी वधूने स्वतः सासरच्या घरी जाण्यास नकार दिला. यानंतर वधू पक्षातील लोकांनी वराला ओलीस ठेवले आणि लग्नाचा सर्व खर्च वराकडून वसूल करण्याची चर्चा सुरू केली. बराच वेळ वधू-वर यांच्यात खर्चाबाबत वाद सुरू होता, त्यानंतर समाजातील इतर लोकांच्या उपस्थितीत दोन्ही पक्षांमध्ये पैशांबाबत चर्चा झाली.
यानंतर लग्नाचा खर्च निश्चित करण्यात आला आणि पैसे परत केले गेले, तेव्हाच वधूच्या कुटुंबाने लग्नाची मिरवणूक आणि वराला सोडले. लग्नाचा खर्च दिल्यानंतर वर पक्षाने वधूला घटस्फोट दिला. केवळ खुर्चीवर बसण्यासाठी घटस्फोटाचा हा मुद्दा सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. कोणत्याही पक्षाकडून पोलीस तक्रार आलेली नाही, तक्रार आल्यास कारवाई केली जाईल, असे स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे.