संग्रहित छायाचित्र
पाटणा: बिहारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २३ वर्षीय तरुणाला सापाचा दंश झाल्यानंतर तो रुग्णालयात उपचारासाठी जात असताना पोलिसांनी त्याला मध्येच अडवले. ज्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला. कैमूर जिल्ह्यात गुरुवारी (२६ सप्टेंबर) ही घटना घडली. मृत तरुणाचे नाव रामलखन प्रसाद असे आहे. तरुण उपचारासाठी जात असताना तो मद्यपान करून पळत असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला सोडण्यासाठी दोन हजारांची लाच मागितली. ज्यात बराच वेळ गेला आणि तरुणाला वेळेत उपचार मिळाले नाहीत.
कैमूर जिल्ह्यातील तरुणाला सापाचा दंश झाल्यानंतर तो घाईघाईत रुग्णालयात जात होता. मात्र पोलिसांनी गस्तीवर असताना त्याला पकडलं. बिहारमध्ये मद्यबंदी आहे. त्यामुळे अवैधपणे मद्यपान केलेल्या लोकांना शिक्षा दिली जाते. या तरुणालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आणि दोन हजारांची लाच मागितली. तरुणाने आपल्या भावाला फोन करून बोलावून घेतले. तीन तासांनी त्याचा मोठा भाऊ आला आणि त्याने ७०० रुपये देऊन कशीबशी त्याची सोडवणूक करून घेतली. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी शिवशंकर कुमार यांनी मात्र पोलिसांनी लाच घेतल्याचा आरोप फेटाळून लावला. कैमूरचे पोलीस अधीक्षक ललित मोहन शर्मा म्हणाले की, या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तीन दिवसांत चौकशीचा अहवाल सादर केला जाईल. जर संबंधित पोलीस दोषी आढळले तर त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल. दुसरीकडे रामलखन प्रसादच्या कुटुंबीयांनी सांगितले की, छनीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोडत असलेल्या गावातील शेतात रामलखन काम करत असताना त्याला साप चावला.
कुटुंबीयांनी केले आरोप
यानंतर रामलखन जवळच्या रुग्णालयात धावत जात होता. मात्र गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्याला अडवले. त्याने अवैधपणे मद्यपान केले असल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला. रामलखनच्या भावानं सांगितलं की, तो पोलिसांकडे विनवणी करत होता. मात्र पोलिसांनी काहीही न ऐकता त्याच्याकडे दोन हजार रुपये मागितले. त्यात तीन तास वाया गेले, ज्यामुळे माझ्या भावाचा जीव गेला. भावाने पुढे म्हटले की, जेव्हा मला रामलखनचा फोन आला तेव्हा मीही शेतात काम करत होतो. मी कसेबसे ७०० रुपये गोळा केले आणि रामलखन असलेल्या ठिकाणी सायकलवर पोहोचलो. पोलिसांना पैसे देऊन मी रामलखनला घेऊन जवळच्या सरकारी रुग्णालयात पोहोचलो. मात्र तिथे पोहोचताक्षणीच रामलखन जमिनीवर कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.