संग्रहित छायाचित्र
चेन्नई: सुपरस्टार रजनीकांत यांच्यावर तमिळनाडूच्या एका मंत्र्याने जहरी टीका केली आहे. 'जुने विरुद्ध नवे' असा राजकारणातील संघर्ष रजनीकांत यांनी मार्मिक शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला होता, ज्याच्यामुळे तमिळनाडूतील मंत्री दुराई मुरुगन हे संतापले असून त्यांनी रजनीकांत यांच्यावर टीका केली आहे. 'दात पडले तरी काही लोक काम करत राहतात' असे विधान मुरुगन यांनी केले आहे. अशा म्हाताऱ्या कलाकारांमुळे तरुणांच्या संधी हिरावल्या जात असल्याचे मुरुगन यांनी म्हटले आहे.
अभिनेते रजनीकांत यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे कौतुक केले होते. स्टॅलिन यांनी जुन्या लोकांना ज्या पद्धतीने हाताळले आहे, त्याला तोड नाही, अशा शब्दांत रजनीकांत यांनी कौतुक केले होते. माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे दिवंगत नेते करुणानिधी यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात रजनीकांत यांनी स्टॅलिन यांचे कौतुक केले होते. हा कार्यक्रम २४ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता. रजनीकांत यांनी या कार्यक्रमात बोलताना म्हटले होते की, शाळेतल्या नव्या विद्यार्थ्यांना हाताळणे ही काही कठीण गोष्ट नाही. मात्र जुन्या विद्यार्थ्यांना (वरिष्ठ नेते) हाताळणे ही कठीण गोष्ट असते. डीएमके पक्षात असे बरेच जुने नेते आहेत. ते काही साधेसुधे विद्यार्थी नाहीत. सगळे अव्वल दर्जाचे विद्यार्थी आहेत. हे सर्व उत्तम गुण मिळवणारे विद्यार्थी असून ते वर्ग सोडायला अजिबात तयार नसतात. खासकरून दुराई मुरुगन. त्यामुळे स्टॅलिन यांच्याबाबत बोलावे तेवढे कमी आहे. त्यांनी ज्या पद्धतीने सगळ्यांना हाताळले आहे, त्याबद्दल त्यांना सॅल्युट करावासा वाटतो.
स्टॅलिन खुश, मुरुगन नाराज
रजनीकांत यांच्या या विधानामुळे स्टॅलिन जरी खूश झाले असले तरी डीएमकेचे नेते आणि खासकरून दुराई मुरुगन जाम संतापले आहेत. रजनीकांत यांनी आपला एकप्रकारे अपमान केल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. यामुळे त्यांनीही रजनीकांत यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, रजनीकांत यांनी म्हटले त्याचप्रमाणे म्हाताऱ्या कलाकारांमुळे तरुण कलाकारांच्या संधी हिरावल्या जात आहेत. दाढ्या वाढल्यानंतर, दात पडल्यानंतरही हे अभिनेते काम करत राहतात. अर्थात नंतर दुराई मुरुगन यांनी आम्ही जुने स्नेही आहोत, माझ्या म्हणण्याचा तसा अर्थ नव्हता, असे सांगत सारवासारव केली आहे. दरम्यान तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी या सगळ्या प्रकाराबाबत बोलताना म्हटले की, तरुणांना राजकारणात यायचे आहे. आपल्याला त्यांना जागा करून देणे आणि योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. रजनीकांत यांचे भाषण लोकांना जबरदस्त आवडले आहे. तुम्ही ते भाषण ऐकायला हवे.