संग्रहित छायाचित्र
अजमेर: अजमेर सेक्स स्कँडलमधील सहा दोषींना मंगळवारी (दि. २०) जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपींना मंगळवारी कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. अजमेरमध्ये ३२ वर्षांपूर्वी घडलेल्या देशातील सर्वात मोठ्या सेक्स स्कँडलमधील न्यायालयाने नफीस चिश्ती, नसीम ऊर्फ टारझन, सलीम चिश्ती, इक्बाल भाटी, सोहिल गनी, सय्यद जमीर हुसेन या दोषींना जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच त्यांना प्रत्येकी पाच लाखांचा दंडही ठोठावला आहे.
शिक्षा सुनावण्यात आली त्यावेळी सहाही आरोपी न्यायालयात हजर होते. आरोपींपैकी इक्बाल भाटी याला दिल्लीहून रुग्णवाहिकेतून अजमेरला आणण्यात आले. उर्वरित आरोपी आधीच न्यायालयात होते. या सहा आरोपींविरुद्ध २३ जून २००१ रोजी आरोपपत्र सादर करण्यात आले. त्याची यंदा जुलैमध्ये सुनावणी पूर्ण झाली.
१९९२ मध्ये शंभराहून अधिक महाविद्यालयीन मुलींवर सामूहिक बलात्कार करून त्यांचे नग्न फोटो प्रसारित करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणात १८ आरोपी होते. चार जणांना शिक्षा झाली आहे. चारजणांची उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
या खटल्यातील एका आरोपीने ३० वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. दोन आरोपींविरुद्ध मुलाच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी एकाला शिक्षा झाली असून दुसऱ्याविरुद्ध खटला सुरू आहे. एक आरोपी फरार असून सहा जणांचा निकाल मंगळवारी आला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी कैलाश सोनी, हरीश तोलानी, फारुख चिश्ती, इशरत अली, मोइजुल्ला उर्फ पुतन अलाहाबादी, परवेझ अन्सारी, नसीम उर्फ टारझन, पुरुषोत्तम उर्फ बबली, महेश लुधानी, अन्वर चिश्ती, शमसू उर्फ मॅराडोना आणि चिश्ती यांना अटक केली. याप्रकरणी ३० नोव्हेंबर १९९२ रोजी अजमेर न्यायालयात पहिले आरोपपत्र सादर करण्यात आले होते.
एकूण किती तरुणींवर बलात्कार झाले कुणास ठाऊक?
या गुन्ह्याचे सूत्रधार, अजमेर युवक काँग्रेसचे अध्यक्ष (तत्कालीन) फारुख चिश्ती, नफीस चिश्ती (तत्कालीन युवक काँग्रेसचे सहसचिव) आणि अन्वर चिश्ती (तत्कालीन युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष) आणि इतर आरोपींनी एका व्यावसायिकाच्या मुलाशी मैत्री केली होती. त्याच्या मैत्रिणीवर बलात्कार करून फोटो काढले. तिला ब्लॅकमेल केल्यानंतर त्यांनी त्याच्या मैत्रिणीला पोल्ट्री फार्ममध्ये आणून तिच्यावर बलात्कार केला. जुन्या रील कॅमेऱ्याने तिचे नग्न फोटो काढले. तिलाही तिच्या मैत्रिणींना त्यांच्याकडे आणण्यास भाग पाडले. यानंतर त्याने एकामागून एक अनेक मुलींवर बलात्कार केले आणि नग्न छायाचित्रे काढली. यानंतर त्यांनी पीडित मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
आरोपींनी फोटो डेव्हलप करण्यासाठी रील दिली होती. नग्न छायाचित्रे पाहून लॅबमधील कर्मचाऱ्यांच्या मनात काळे आले. फोटो लॅबमधूनच मुलींचे न्यूड फोटो बाजारात आले. मोजक्याच लोकांकडे मास्टर प्रिंट होत्या, पण त्यांच्या झेरॉक्स प्रती शहरात पसरू लागल्या. यामुळे सहा महाविद्यालयीन तरुणींनी आत्महत्या केल्या होत्या. अनेक पीडित तरुणींनी बदनामीच्या भीतीपायी गप्प राहणे पसंत केले. यामुळे या प्रकरणात एकूण किती तरुणींवर बलात्कार झाले, याचा आकडा कधीच पुढे येऊ शकला नाही.
सततच्या ब्लॅकमेलमुळे अस्वस्थ होऊन काही विद्यार्थिनींनी धाडस दाखवत पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणात अनेक श्रीमंतांची नावे समोर आली होती. यात मास्टरमाईंड अजमेर युवक काँग्रेसचे अध्यक्ष फारुख चिश्ती, नफीस चिश्ती आणि अन्वर चिश्ती यांचीही नावे होती. तत्कालीन भैरोसिंह शेखावत सरकारने या प्रकरणाचा तपास सीआयडी-सीबीकडे सोपवला होता.