संग्रहित छायाचित्र
भोपाळ: मध्य प्रदेशातील छतरपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पीडित पतीने आपल्या पत्नीचे वर्णन दरोडेखोर असे केले आहे. तिला अनेक पती आहेत. पत्नीपासून वाचण्यासाठी त्याने पोलिसांकडे दाद मागितली आहे. एसपी कार्यालयात जाऊन त्याने पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे. प्रत्येक वेळी ती तिच्या जुन्या पतीला सोडून नवीन नातेसंबंध सुरू करते. यासाठी ती धर्मही बदलते असा आरोपही त्याने केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
छतरपूर एसपी कार्यालयात जनसुनावणी दरम्यान या पतीने आपल्या पत्नीविरोधात एक अर्ज दिला आहे. फूलचंद कुशवाह असे या पतीचे नाव आहे. त्याने सांगितले की, विनीता उर्फ ब्रिजेश हिने प्रेमाच्या जाळ्यात अडकवून २०११ मध्ये माझ्याशी लग्न केले. लग्नानंतर समजले की विनीता ब्यूटी पार्लरमध्ये काम करते. या व्यवसायाच्या नावाखाली तिचे अनेक समाजकंटकांशी संबंध आहेत. मी त्याचा निषेध केल्याने पत्नीने त्याच्याविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशन, छतरपूर येथे खोटी तक्रार दाखल केली. पत्नी विनीता हिने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतरही तिने आणखी कोणत्या ना कोणत्या प्रकरणात मला अडकवण्याचा प्रयत्न केला. तिच्या प्रियकराकडून मला जिवे मारण्याच्या आणि खोटी पोलीस तक्रार दाखल करण्याच्या धमक्या येत आहेत, असा आरोपही फूलचंद कुशवाह याने केला. पत्नीपासून आपल्या जिवाला धोका आहे. तिला त्याची मालमत्ता बळकवायची आहे. त्यामुळे पोलिसांनी आपल्याला वाचवावे, अशी विनंतीही त्याने या अर्जात केली आहे.
पत्नी विनीता उर्फ ब्रिजेश उर्फ सलमा हिने २००० मध्ये रामवीर तोमर याच्यासोबत लग्न केले होते. तिने रामवीर तोमर याची संपत्ती हडप करून त्याच्याशी संबंध संपवले. २००६ मध्ये पत्नीने धर्म बदलून तिचे नाव सलमा असे ठेवले. त्यानंतर तिने भुरे खान नावाच्या व्यक्तीशी लग्न केले. भुरे खान याचीही मालमत्ता तिने बळकावली आणि ती पुन्हा विनीता सिंग झाली. २००८ मध्ये ती पुन्हा हिंदू झाली आणि तिने टिकमगड येथील अजय खराया याच्यासोबत लग्न केले. २००९ मध्ये तिने छतरपूर येथील जगदीश प्रसाद सिंह यांच्याशी लग्न केले. त्यानंतर २०११ मध्ये तिने माझ्याशी प्रेमाचे नाटक करून लग्न केले, अशी माहिती फुलचंद याने पोलिसांना दिली. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याचे प्रभारी बाल्मिक चौबे यांनी, ही बाब आमच्या लक्षात आली आहे. तक्रारीची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. तपास सुरू आहे. तपासाच्या मुद्यांच्या आधारे या प्रकरणात पुढील कारवाई केली जाईल, असे सांगितले.