संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली: कोविड लस कोविशील्ड बनवणारी कंपनी सीरम इन्स्टिट्यूटने मंकीपॉक्सला प्रतिबंध घालणारी लस तयार करण्याची घोषणा केली आहे.
कंपनीचे सीईओ अदर पूनावाला म्हणाले, ‘‘मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केल्यानंतर आम्ही लाखो लोकांना मदत करण्यासाठी एक लस विकसित करत आहोत. आशा आहे की आम्ही ती एका वर्षात पूर्ण करू.’’
जगातील एमपॉक्सच्या वाढत्या प्रकरणांची दखल घेत १९ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने देशातील सर्व बंदरे आणि विमानतळांसह पाकिस्तान आणि बांगलादेश सीमेवर अलर्ट जारी केला होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अधिकाऱ्यांना बाहेरून येणाऱ्या प्रवाशांमध्ये मंकीपॉक्सच्या लक्षणांबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे. सध्या भारतात मंकीपॉक्सची लागण कोणालाही झालेली नाही. देशात या आजाराचे शेवटचे प्रकरण मार्च २०२४ मध्ये उघडकीस आले होते.
१९ ऑगस्ट रोजी आरोग्य मंत्रालयाने दिल्लीतील राम मनोहर लोहिया, सफदरजंग आणि लेडी हार्डिंग या केंद्राच्या तीन मोठ्या रुग्णालयांमध्ये नोडल केंद्रे तयार केली आहेत. मंकीपॉक्सच्या रुग्णांवर उपचार आणि काळजी घेण्यासाठी या रुग्णालयांमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत.
केंद्राने सर्व राज्य सरकारांना त्यांच्या राज्यातील रुग्णालयांमध्ये मंकीपॉक्स रुग्णांसाठी आवश्यक व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंतच्या मूल्यांकनानुसार मंकीपॉक्सचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होण्याचा धोका कमी आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, २०२२ पासून जगभरातील ११६ देशांमध्ये मंकीपॉक्सची ९९,१७६ प्रकरणे आणि २०८ मृत्यूची नोंद झाली आहे. यावर्षी आतापर्यंत १५,६०० हून अधिक प्रकरणे आणि ५३७ मृत्यूची नोंद झाली आहे. २०२२ पासून भारतात मंकीपॉक्सची ३० प्रकरणे नोंदवली गेली आहेत. मंकीपॉक्सच्या चाचणीसाठी भारतात ३२ प्रयोगशाळा आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने १४ ऑगस्ट रोजी मंकीपॉक्सला जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केले. या आजाराला आरोग्य आणीबाणी घोषित करण्याची दोन वर्षांतील ही दुसरी वेळ आहे. डब्ल्यूएचओ देखील चिंतित आहे कारण मंकीपॉक्सच्या वेगवेगळ्या प्रादुर्भावांमध्ये मृत्यू दर भिन्न आहेत. अनेक वेळा ते १० टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार मंकीपॉक्सचा उगम आफ्रिकन देश कांगोमधून झाला आहे. त्यानंतर ते शेजारील देशांमध्ये झपाट्याने पसरले. आफ्रिकेतील १० देशांना याचा गंभीर फटका बसला आहे. कोविडप्रमाणेच तो प्रवासातून जगाच्या विविध भागात पसरत आहे.