पगार दहा हजार, नोटीस दोन कोटींची; आयकर विभागाचा गलथानपणा उघड

आयकर विभागाने दहा हजार रुपये महिन्याला म्हणजेच वर्षाला एक लाख २० हजार रुपये कमवणाऱ्या व्यक्तीला नोटीस पाठवली आहे. ही नोटीस तब्बल २ कोटी ३ हजार ३०८ रुपयांचा कर भरण्याची आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Edited By Admin
  • Fri, 27 Sep 2024
  • 04:25 pm

राजीव कुमार वर्मा

पाटणा: आयकर विभागाने दहा हजार रुपये महिन्याला म्हणजेच वर्षाला एक लाख २० हजार रुपये कमवणाऱ्या व्यक्तीला नोटीस पाठवली आहे. ही नोटीस तब्बल २ कोटी ३ हजार ३०८ रुपयांचा कर भरण्याची आहे. एका तेल व्यापाऱ्याकडे नोकरी करणाऱ्या राजीव कुमार वर्मा यांना ही नोटीस आली आहे. हे प्रकरण बिहारमधील गया जिल्ह्यातील आहे.

आयकर विवरणपत्र म्हणजेच आयकर रिटर्न दाखल करणारे देशात काही टक्केच लोक आहेत. आयकर विभागाकडून विवरणपत्र दाखल झालेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाते. तसेच ज्या लोकांचे उत्पन्न आयकर मर्यादा असलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त आहे, त्यांचा शोधही घेतला जातो. आयकर विभागाचा वेगळाच किस्सा बिहारमधून समोर आला आहे.

आयकर विभागाने राजीव कुमार वर्मा यांना २ कोटी ३ हजार ३०८ रुपये कर भरण्याची नोटीस पाठवली आहे. या नोटिशीनुसार त्यांना ६७ लाख रुपये दंडही केला आहे. ही सर्व रक्कम दोन दिवसांत भरण्याचे म्हटले आहे. आयकर विभागाची ही नोटीस मिळाल्यावर राजीव हे प्रचंड घाबरले. ते गेल्या चार दिवसांपासून कामावरसुद्धा जात नाहीत.

शेवटी ते गया येथील आयकर विभागाच्या कार्यालयात गेले. त्यावेळी त्यांना पाटणा  येथे जाण्याचे सांगण्यात आले. २०१५ मध्ये राजीव यांनी कॉर्पोरेशन बँकेत २ लाख रुपयांची मुदत ठेव (एफडी) केली होती. त्यांना पैशांची गरज असल्यामुळे २०१६ मध्ये ती मुदत ठेवची पावती त्यांनी तोडली. परंतु अचानक आयकर विभागाने त्या प्रकरणात त्यांना २ कोटी ३ हजार ३०८ रुपये आयकरची नोटीस पाठवली.

आयकर विभागाचा आरोप आहे की, राजीव यांनी २०१५-२०१६ मध्ये २ कोटी रुपयांची मुदत ठेव केली होती. त्याचा कर अद्याप भरला नाही. राजीव यांच्या या प्रकरणामुळे पुन्हा एकदा सरकारी यंत्रणेचा निष्काळजीपणा समोर आला आहे. एक गरीब व्यक्ती जो आयकर स्लॅबमध्ये येत नाही, त्याला २ कोटींहून अधिक कराची नोटीस पाठवण्यात आली. आता या प्रकरणी पुढे काय कारवाई होते हे बघणे रंजक ठरणार आहे.

Share this story

Latest