संग्रहित छायाचित्र
दिल्ली येथील 'इंडिया गेट'चे नाव बदलून त्याचे नाव 'भारत माता द्वार' करावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्यांनी अशी मागणी केली आहे. सिद्दीकी यांची मागणी ही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.
जमाल सिद्दीकी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात काय म्हटले आहे?
"आपल्या नेतृत्वाखाली भारताच्या १४० कोटी भारतीय भावा-बहिणींमध्ये राष्ट्रप्रेम आणि भारतीय संस्कृतीप्रती प्रेम व समर्पणाची भावना अधिकाधिक वाढली आहे. आपल्याच कार्यकाळात मुघल आक्रमक आणि लुटारू इंग्रजांनी दिलेले घाव भरले गेले आहेत. गुलामीच्या डागांपासून भारत मुक्त होत आहे. यामुळे संपूर्ण भारतात आनंद आहे."
"महोदय, आपण क्रूर मुघल औरंगझेब याचे नाव असलेल्या रस्त्याचे नामकरण करून त्याचे नाव ए. पी. जे. कलाम मार्ग असे केले. इंडिया गेटवर असलेली किंग जॉर्ज पंचम यांची मूर्ती हटवून नेताजी सुभाषचंद्र बोस यांची मूर्ती बसवली. राजपथाचे नामकरण कर्तव्य पथ असे केले त्यामुळे ते भारताच्या संस्कृतीला जोडले गेले आहे. त्याचप्रमाणे, इंडिया गेटचे नामकरण भारत माता द्वार करावे, ही विनंती."
"इंडिया गेटचे नामकरण भारत माता द्वार असे केल्याने त्या स्तंभावर कोरलेल्या हजारो शहीद देशभक्तांच्या नावांना खरी श्रद्धांजली मिळेल. आपल्याकडून या प्रस्तावावर विचार करण्याची आणि इंडिया गेटचे नामकरण भारत माता द्वार करण्याचा विचार करावा, अशी विनंती आहे."
इंडिया गेट
पहिल्या महायुद्धात भारतीय सैन्यादलातील जवानांच्या बलिदानाचा इंडिया गेट हे युद्ध स्मारक बांधले गेले. ते नवी दिल्ली येथील कर्तव्य पथाजवळ आहे. सर एडविन लुटियन्स यांच्या संकल्पनेतून ही रचना बांधली गेली आहे. रोमच्या आर्क ऑफ कॉन्स्टंटाइन पासून प्रेरणा घेऊन ही वास्तू उभारल्याचे मानले जाते.
या आधी दिल्लीमधल्या राजपथाचे नामकरण कर्तव्यपथ असे करण्यात आले आहे. तर राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल आणि अशोक हॉलचे नामकरण अनुक्रमे 'गणतंत्र मंडप' आणि 'अशोक मंडप' असे करण्यात आले आहे.