प्रातिनिधिक छायाचित्र....
नवी दिल्ली : भारतीय लष्कर आता अधिकाधिक उच्च तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. लष्कर 'ड्रोन्स'पासून 'जेट पॅक सूट'पर्यंत खरेदी करण्यावर भर देत आहे. यासोबतच आता भारतीय लष्कराने 'रोबोटिक म्युल' खरेदी केले आहेत. हे रोबोटिक म्युल दिसायला कुत्र्यासारखे आहेत. लष्कराने जास्तीत जास्त 'रोबोटिक म्युल' खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
भारतीय लष्कराने रोबोटिक डॉग म्युल म्हणजेच मल्टी-युटिलिटी लेग्ड इक्विपमेंटचा (एमयूएलई) वापर करण्यास सुरुवात केली आहे. हे रोबोटिक श्वान किंवा खेचर सध्या पाळत ठेवण्यासाठी आणि हलके वजन वाहून नेण्यासाठी तैनात करण्यात आले आहे. प्रामुख्याने ते चीनच्या सीमेवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात करण्याची शक्यता आहे. रोबोटिक म्युल हे एखाद्या कुत्र्याप्रमाणे दिसत असून याला चार पाय आहेत. या म्युलची लांबी, रुंदी आणि उंची १ मीटर असून, रोबो म्युलचे वजन ६० किलोपर्यंत असून हे म्युल उंच व डोंगराळ भागात शस्त्रास्त्र वाहून नेण्यास फायदेशीर आहेत. तब्बल १० वर्षांपर्यंत हे रोबोटिक म्युल वापरता येऊ शकते. हे रोबोटिक म्युल सुमारे ९० किलोपर्यंत (१९८ पौंड) वजन वाहून नेऊ शकते. तसेच रोबोटिक म्युल वापरण्यासही सोपे आणि कमी खर्चाचे आहे.
दुर्गम भागात बजावणार अचूक कामगिरी....
हे रोबोटिक म्युल केवळ बर्फ आणि पर्वतांमध्येच फिरू शकत नाही, तर अरुंद आणि अंधाऱ्या ठिकाणीही याचा प्रभावी वापर केला जाऊ शकतो. एखाद्या ठिकाणी दहशतवादी किंवा शत्रू लपले असल्यास त्यांना ठार मारण्यासाठी तसेच त्यांची माहिती मिळवण्यासाठी याचा प्रभावीपणे वापर केला जाऊ शकतो. या रोबोटिक म्युलमध्ये ३६० डिग्री कॅमेऱ्यांच्या मदतीने व नाइट व्हीजन कॅमेऱ्याच्या माध्यमातून मागे असलेल्या सैनिकांना युद्धभूमीची प्रत्यक्ष माहिती देऊ शकतात. या रोबोटिक म्युलवर बंदूक बसवून त्यावरून फायरिंग देखील केली जाऊ शकते. आर्कव्हेंचर्स ही कंपनी घोस्ट रोबोटिक्सच्या परवान्याअंतर्गत देशातच याची निर्मिती करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. या रोबो म्युलवर देखरेखीसाठी थर्मल कॅमेरे व इतर सेन्सर बसवण्यात आले आहेत. याशिवाय त्यामध्ये छोटी शस्त्रेही बसवता येऊ शकतात. याशिवाय सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना लहान वस्तू वाहून नेण्यासाठी देखील या रोबोटिक म्युलचा वापर करता येतो.
थर्मल कॅमेरे आणि रडारने सुसज्ज असलेले हे रोबोटिक म्युल खडबडीत जमीन, १८ सेमी उंच पायऱ्या व ४५ अंश डोंगराळ प्रदेशावर सहज चढू शकते. या रोबोचे वजन सुमारे ५१ किलो असून २७ इंच उंच आहे. हा रोबो ३.१५ तास सतत चालू शकतो. अवघ्या एका तासात चर करून हा रोबो सलग १० तास काम करू शकतो. त्याची सामान वाहून नेण्याची क्षमता ही १० किलो आहे. त्यात थर्मल कॅमेरे व रडारसारखी अनेक उपकरणे बसवता येतात. हा रोबो वाय-फाय किंवा लाँग टर्म इव्होल्युशन म्हणजेच एलटीईवर देखील वापरला जाऊ शकतो. कमी अंतरासाठी, वाय-फाय वापरले जाऊ शकते. तंत्र १० किमी पर्यंतच्या अंतरासाठी ४ जी एलटीई वापरले जाऊ शकते. हा रोबो रिमोट कंट्रोलद्वारे नियंत्रित केला जातो.