अयोध्या: अयोध्येतील राम मंदिर पहिल्याच पावसाने गळू लागले आहे. जेथे रामलल्ला विराजमान, तेथेच पाणी साचले असल्याची माहिती मुख्य पुजाऱ्यांनी सोमवारी (दि. २४) दिली.
राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले, ‘‘ज्या गर्भगृहात रामलल्ला विराजमान झाले, तेही पाण्याने भरले आहे. एक-दोन दिवसांत व्यवस्था न झाल्यास दर्शन आणि पूजेची व्यवस्था थांबवावी लागेल.’’
शनिवारी (दि. २२) रात्री २ ते ५ वाजेपर्यंत जोरदार पाऊस झाला. त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यासमोरील मंडप चार इंच पाण्याने भरला. मंदिरातील लोकांना विजेचा धक्का बसण्याची भीती होती. त्यामुळे पहाटे चार वाजता होणारी आरती मशालीच्या उजेडात करावी लागली. सकाळी सहा वाजताची आरतीही याच पद्धतीने झाली, असेही सत्येंद्र दास यांनी सांगितले.
योध्येत शनिवार-रविवारच्या रात्री ६७ मिलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे संपूर्ण शहर जलमय झाले. काही ठिकाणी रस्ते खचले आहेत. सहा महिन्यांपूर्वी बांधलेल्या अयोध्याधाम रेल्वे स्थानकाची २० मीटर लांबीची सीमा भिंतही कोसळली.
पाण्याचा निचरा होत नसल्याने ही समस्या उद्भवत आहे. मुख्य पुजारी यांच्या मते, हे जितक्या लवकर दुरुस्त केले जाईल तितके चांगले. रात्री १० वाजेपर्यंत पाण्याचा निचरा होऊ शकतो. पहिल्या मजल्यावर बांधकाम सुरू आहे. रॉड घालण्यासाठी छिद्रे शिल्लक आहेत. तेथून पाणी मंदिराच्या आत आले.
शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे अयोध्या धाम रेल्वे स्थानकाची २० मीटर लांबीची सीमा भिंत कोसळली. या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन ३० डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले. सीमा भिंत कोसळल्याने गटाराचे पाणी अनेक घरांमध्ये आणि मंदिरांमध्ये शिरले आहे.
इमामबाराकडे जाणारा रस्ता खचला असून येथील गटार तुंबली आहे. बिर्ला धर्मशाळेसमोरील मंदिर गलिच्छ गटाराच्या पाण्याने तुडुंब भरले होते. इतर अनेक भागात पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. लोक म्हणाले, ‘‘पहिल्याच पावसात महापालिका आणि पीडब्ल्यूडी उघडे पडले. फतेहगंज पुष्पराज चौकाच्या मध्यभागी पोलिस लाईनजवळचा रस्ता खचला.’’
बिर्ला धर्मशाळेसमोरील मंदिरात गटाराचे घाण पाणी तुंबले आहे. शहराकडे जाणारे रस्तेही जलमय झाले आहेत. इमामबाराचा रस्ता खचला आहे.
छोटी मंदिरेही पाण्याने भरली
आचार्य सत्येंद्र दास म्हणाले, ‘‘गर्भगृहाव्यतिरिक्त तेथे बांधलेली छोटी मंदिरेही पाण्याने भरलेली आहेत. याकडे लक्ष दिले पाहिजे की, जे काही केले आहे त्यात काय कमी राहिले आहे? पहिले म्हणजे राम मंदिरातून पावसाचे पाणी जाण्यासाठी जागा नाही. वरून पाणीही गळू लागले, त्यामुळे गोंधळ उडाला आहे.’’
राम मंदिरावर आतापर्यंत १,८०० कोटींचा खर्च
राम मंदिरात फक्त एक मजला तयार आहे. यासाठी १,८०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मुख्य शिखर, परकोटा, पाच छोटी शिखरे, १३ मंदिरे, ट्रस्ट ऑफिस, व्हीव्हीआयपी प्रतीक्षालय, प्रवासी सुविधा केंद्र, संग्रहालय, ग्रंथालय, संशोधन संस्था यासह अनेक कामे शिल्लक आहेत. मंदिराचे डिझाईन आणि बांधकाम व्यवस्थापक गिरीश सहस्त्रभोजनी म्हणतात की उर्वरित कामासाठी आणखी २,००० कोटी रुपये लागतील.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, राम मंदिरासाठी आतापर्यंत ३,२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त देणग्या मिळाल्या आहेत. देणग्या अजूनही येत आहेत. कथाकार मोरारी बापू यांनी सर्वाधिक ११.३ कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
...तर मंदिरात पूजा करणे कठीण होईल : आचार्य सत्येंद्र दास
एएनआय वृत्तसंस्थेसोबत बोलताना आचार्य सत्येंद्र दास यांनी राम मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी साचत असल्याचे सांगितले. ‘‘जिथे प्रभू श्रीमाराची मूर्ती विराजमान आहे, तिथे पहिल्याच पावसात गळती सुरु झाली आहे. पहिल्या पावसामुळे मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी साचले होते. त्यामुळे बांधकामावेळी नेमकी काय चूक झाली, याची माहिती घेणं आवश्यक आहे. तसेच यावर उपाययोजना न केल्यास मंदिरात पूजा करणे कठीण होईल. मंदिराचे बांधकाम अद्याप सुरू आहे. या मंदिरात आणखी काही मुर्ती स्थापन करण्यात येणार आहे. २०२५ पर्यंत हे बांधकाम पूर्ण होईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र, एका वर्षात हे बांधकाम पूर्ण होणं अशक्य आहे,’’ असे ते म्हणाले.