संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) नेते राम माधव यांचा वनवास संपला असून त्यांच्यावर भाजपकडून महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पाच वर्षांनंतर भाजपला राम माधव यांची आठवण कशी काय झाली असाही सवाल राजकीय तज्ज्ञांकडून केला जात आहे. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची लिस्ट जारी केली होती. मात्र त्याच प्रमुख नेत्यांची नावे नसल्याने ती लिस्ट मागे घेण्यात आली. या घटनेमुळे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.
राम माधव यांना जम्मू-काश्मीरचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडेही जम्मू-काश्मीरची जबाबदारी असणार आहे. मात्र तिथे पुन्हा भाजपचे सरकार आणण्याची जबाबदारी सर्वस्वी राम माधव यांच्यावर टाकण्यात आल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या विधानानंतर भाजप आणि संघ परिवारात आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले होते. याशिवाय सरसंघचालक मोहन भागवत यांनीही एका कार्यक्रमात नाव न घेता पराभवाची कारणमीमांसा करताना नेत्यांना अहंकार नडल्याचे विधान केले होते. या पार्श्वभूमीवर 'कठीण समय येता कोण कामास येतो' या उक्तीनुसार आता पक्षाला राम माधव यांची आठवण आल्याची चर्चा आहे. राम माधव यापूर्वीही भाजप सरचिटणीस असताना जम्मू-काश्मीरचे प्रभारी होते. पीडीपी सरकार स्थापन करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सरकार स्थापन झाल्यानंतर मात्र ते पुन्हा संघात गेले होते.
२०१४ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये भाजप सरकार स्थापनेमागील क्रेडिट राम माधवांकडे जाते. त्यानंतर पुढील पाच वर्षे ते पक्षात फार दिसले नाहीत. मात्र राम माधव यांना जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा भाजप सरकार आणण्यासाठी मैदानात उतरवण्यात आल्याचा राजकीय तज्ज्ञांचा अदमास आहे. भाजपला जम्मू-काश्मीरमध्ये २५-३५ जागा जिंकण्याचे ध्येय आहे. राम माधव यांचे जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक पातळीवर चांगले काम आहे. त्यांची वापसी पक्षाला फायदेशीर ठरू शकते. राम माधव इंडिया फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत. इंडिया फाऊंडेशनचे थिंक टँक आहेत. २०१४-२०२० पर्यंत राम माधव यांनी भाजपचे राष्ट्रीय महासचिव म्हणून काम पाहिलेले आहे. जम्मू-काश्मीरशिवाय आसाम, उत्तर पूर्वेकडील राज्यात काम करण्याचा अनुभव आहे. २०१४ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये भाजप युतीचे सरकार स्थापन करण्यापासून २०१८ मध्ये त्रिपुरामध्ये भगवा झेंडा फडकवण्यात राम माधव यांची मोठी भूमिका राहिली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी नेता मेहबुबा मुफ्तीसह सत्तेत युतीपासून जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवण्याच्या तयारीत राम माधव यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.