राहुल गांधी काहीच चुकीचे बोललेले नाहीत; शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केली पाठराखण

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून लोकसभा विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भाषणावरून बराच राजकीय वाद पाहायला मिळत आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी केलेल्या भाषणावर तेव्हा सत्ताधारी बाकांवरून तीव्र आक्षेप घेण्यात आला होता. राहुल गांधींच्या भाषणातील काही भाग वगळण्यात देखील आला होता.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 9 Jul 2024
  • 03:21 pm
Shankaracharya Swami Avimukteswaranand Saraswati, Rahul Gandhi, Congress, BJP, Hindu, Hindutva

संग्रहित छायाचित्र

हिंदू अवमानाचा दावा करणारे भाजप नेते तोंडघशी !

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून लोकसभा विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भाषणावरून बराच राजकीय वाद पाहायला मिळत आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी केलेल्या भाषणावर तेव्हा सत्ताधारी बाकांवरून तीव्र आक्षेप घेण्यात आला होता. राहुल गांधींच्या भाषणातील काही भाग वगळण्यात देखील आला होता. त्यावरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत गोंधळ घातला. या सर्व घडामोडी एकीकडे घडत असताना दुसरीकडे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी राहुल गांधींच्या भाषणाची पाठराखण केली आहे. राहुल गांधी यांच्या भाषणात चुकीचे काहीच नसल्याचे सांगत त्यांनी भाजप नेत्यांना तोंडघशी पाडले आहे.  

एकीकडे सत्ताधारी पक्षांकडून राहुल गांधींना हिंदू धर्माच्या विरोधात वक्तव्य केल्याचा दावा करत लक्ष्य केले जात आहे. मात्र, दुसरीकडे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी राहुल गांधींची पाठराखण केली आहे. राहुल गांधींचे पूर्ण भाषण आपण ऐकले असून त्यात ते काहीही चुकीचे बोलले नसल्याची भूमिका त्यांनी माध्यमांशी बोलताना मांडली. तसेच, यासाठी त्यांनी कावळ्याचे उदाहरणही दिले आहे. 'आम्हाला जेव्हा कुणी सांगते की कावळ्याने कान चावला, तेव्हा आम्ही आधी कानाला हात लावून तपासतो की कान व्यवस्थित आहे की नाही. जर कान व्यवस्थित नसेल, तर आम्ही कावळ्याच्या मागे लागतो. राहुल गांधींनी हिंदू धर्मविरोधी वक्तव्य केल्याचे जेव्हा आम्हाला सांगण्यात आले, तेव्हा आम्ही राहुल गांधींनी संसदेत दिलेले संपूर्ण भाषण ऐकले. आम्ही त्यात पाहिले की हिंदू धर्माविषयी ते काहीही चुकीचे बोलत नाहीत. ते तर म्हणताहेत की, हिंदू धर्मात हिंसेला जागाच नाही,  असे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले.

जर राहुल गांधी म्हणत असतील की हिंदू धर्मात हिंसेला स्थान नाही, तर मग त्यांच्यावर हिंदू धर्माच्या विरोधात वक्तव्य केले आहे, असा आरोप करणे, त्यांच्या भाषणातला निवडक भाग काढून त्याचा प्रसार करणे हा गुन्हा आहे असे आम्हाला वाटते. हा अपप्रचार आहे. असे करणाऱ्या लोकांना शिक्षा व्हायला हवी. मग ते माध्यम प्रतिनिधी का असेनात. हे चुकीचे आहे”, अशा शब्दांत स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.  

एखाद्या व्यक्तीने जी गोष्ट म्हटलेलीच नाही त्यासाठी त्या व्यक्तीला विरोध करणे, त्याला दोषी मानणे चुकीचे आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की हिंदू हिंसा करू शकत नाही. त्यानंतर जे लोक समोरच्या बाजूला सरकारी पक्षात बसलेत, त्यांना उद्देशून ते म्हणाले की तुम्ही स्वत:ला हिंदू म्हणता आणि हिंसा हिंसा म्हणत द्वेष पसरवता.  त्यामुळे त्यांचे म्हणणे विशिष्ट पक्षासाठी आहे. त्याच्या आधीच्या वक्तव्यात ते हिंदू धर्माविषयी बोलले. आम्ही त्यांचे पूर्ण भाषण ऐकले आणि त्यात आम्हाला काहीही चुकीचे वाटले नाही, असेही शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी नमूद केले.

हिंदू धर्माबाबत काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधींनी आपल्या भाषणात हिंदू धर्माच्या विरोधात वक्तव्य केल्याचा आरोप सत्ताधारी पक्षांकडून केला जात आहे. हिंदू कधीही हिंसा करू शकत नाही. कधीही द्वेष आणि भीती पसरवू शकत नाही. त्यामुळे हे लोक (सत्ताधारी पक्ष) हिंदू नाहीयेत. कारण ते २४ तास हिंसेवरच बोलत असतात. नरेंद्र मोदी, भाजपा किंवा आरएसएस म्हणजे पूर्ण हिंदू समाज नाही. हा ठेका काही फक्त भाजपने घेतलेला नाही. तुम्ही हिंदू नाही आहात. हिंदू धर्मात स्पष्टपणे म्हटले आहे की सत्यासोबत आपण उभे राहायला हवे.  सत्यापासून दूर जाता कामा नये. माझे बोलणे यांच्या मर्मावर लागल्यामुळेच हे आरडाओरड करत आहेत”, असे राहुल गांधी लोकसभेतील भाषणादरम्यान म्हणाले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest