संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) अध्यक्षपदी १९८३ बॅचच्या आयएएस अधिकारी आणि माजी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १ ऑगस्ट २०२४ रोजी त्या पदभार स्वीकारणार आहेत. मे २०२२ पासून या पदावर मनोज सोनी होते. त्यांची पाच वर्षे उरलेली असतानाच त्यांनी राजीनामा दिला. उमेदवारांनी निवडीसाठी बनावट जात आणि अपंगत्व प्रमाणपत्रे वापरल्याबद्दल वाद सुरू झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. यामुळे आता त्यांच्या जागी प्रीती सुदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ एप्रिल २०२५ पर्यंत असणार आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी १ ऑगस्ट २०२४ पासून लागू होणाऱ्या युपीएससीच्या अध्यक्षपदाची कर्तव्ये पार पाडण्यासाठी संविधानाच्या कलम ३१६ च्या कलम (१ (अ १) अंतर्गत युपीएससीच्या सदस्या प्रीती सुदान यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. प्रीती सुदान या आंध्र प्रदेश केडरमधील १९८३ बॅचच्या आयएएस अधिकारी असून त्या जुलै २०२० मध्ये केंद्रीय आरोग्य सचिव म्हणून सेवानिवृत्त झाल्या. सुमारे ३७ वर्षांचा सरकारी प्रशासनाचा अनुभव त्यांच्याकडे आहे.