संग्रहित छायाचित्र
पाटणा: बिहारच्या सुपौल जिल्ह्यातील त्रिवेणीगंजमध्ये बुधवारी (३१ जुलै) एक धक्कादायक घटना घडली आहे. लालपट्टी येथील एका खासगी शाळेतील नर्सरीमधील पाच वर्षांच्या विद्यार्थ्याने तिसरी इयत्तेत शिकणाऱ्या १० वर्षीय विद्यार्थ्यावर गोळी झाडली आहे. गोळी त्या विद्यार्थ्याच्या डाव्या पायात घुसली आहे. हा चिमुरडा शाळेच्या दप्तरातून बंदूक घेऊन आला होता. दरम्यान, बंदुकीच्या गोळीने जखमी झालेल्या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांनी त्याच्या पायात घुसलेली गोळी बाहेर काढली असून त्याची प्रकृती आता स्थिर होत आहे. तो सध्या अतिदक्षता विभागात आहे.
या घटनेने शाळा हादरली आहे. हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर शाळेने याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तपास सुरू केला. या विद्यार्थ्याकडे बंदूक कुठून आली याचा पोलीस शोध घेत आहेत. शाळा भरल्यानंतर प्रार्थनेच्या काही वेळ आधी ही घटना घडली आहे. या आरोपी विद्यार्थ्याचे वडील पूर्वी याच शाळेत सुरक्षारक्षक म्हणून काम करायचे, असे स्थानिकांनी सांगितले आहे. जखमी विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी सागितले की आम्हाला शाळेच्या मुख्याध्यापकांचा फोन आला होता, ते आम्हाला म्हणाले, तुमच्या मुलाला गोळी लागली असून आम्ही त्याला रुग्णालयात दाखल केले आहे, तुम्ही तातडीने रुग्णालयात या. दरम्यान, मुख्याध्यापकांनी आरोपी विद्यार्थ्याच्या वडिलांना या घटनेची माहिती दिल्यानंतर या विद्यार्थ्याचे वडील शाळेत दाखल झाले. त्यांनी मुख्याध्यापकांच्या टेबलावर ठेवलेली बंदूक पाहिली, सर्व घटनेची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी टेबलावर ठेवलेली बंदूक उचलली, मुलाला कडेवर घेतले आणि तिथून पळ काढला. शाळेच्या सुरक्षा भितीवरून उडी मारून ते तिथून फरार झाले. पोलीस या दोघांचा शोध घेत आहेत. आरोपी मुलाचे वडील एका दुचाकीवरून शाळेत आले होते. ती दुचाकी शाळेच्या आवारात सोडून ते तिथून पळून गेले आहेत.
जखमी मुलाचे कुटुंब दहशतीत
जखमी विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी शाळा व पोलीस प्रशासनाकडे या घटनेचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात अशी कोणतीही घटना घडू नये. या घटनेनंतर जखमी विद्यार्थ्याचे पालक मोठ्या धक्क्यात आहेत. एक लहानगा मुलगा असे काहीतरी करू शकेल यावर त्यांचा विश्वास बसत नाही. जखमी विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलिसांकडे मागणी केली आहे की त्यांनी आरोपी मुलाच्या पालकांना ताब्यात घेतले पाहिजे. तसेच त्यांच्या नातेवाईकाकडे चौकशी केली पाहिजे.