संग्रहित छायाचित्र
पतंजलीचे उत्पादन असलेल्या दिव्या दंतमंजनमध्ये मांसाहारी सामग्री असल्याचा दावा केला जात आहे. यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
याचिकाकर्ते वकील यतीन शर्मा यांनी आरोप केला आहे की कंपनी आपल्या 'दिव्य दंत मंजन'मध्ये 'समुद्र फेन' (कटलफिश) नावाचा मांसाहारी पदार्थ वापरते. त्यांनी असेही म्हटले आहे की, मांसाहारी घटकांचा वापर करूनही उत्पादनाला हिरवे म्हणजेच शाकाहारी लेबल देण्यात आले आहे.
त्या याचिकेची दखल घेत न्यायालयाने पतंजली आयुर्वेद आणि बाबा रामदेव यांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी केंद्र सरकार आणि हे उत्पादन बनवणाऱ्या पतंजलीच्या दिव्या फार्मसीलाही नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
पतंजली वेबसाइटनुसार दिव्या दंतमंजन हे हिरड्या तसेच दातांसाठी सर्वात शक्तिशाली औषधी उत्पादन आहे. या टूथ पावडरचा वापर केल्याने हिरड्या मजबूत होतात. यामुळे पायरिया (हिरड्यांमधून रक्त आणि पू येणे) यांसारख्या दातांच्या समस्या दूर होतात.
उत्तराखंड सरकारने १७ मे रोजीचा आदेश रोखून धरला आहे, यानुसार पतंजली आयुर्वेद आणि दिव्या फार्मसीच्या १४ उत्पादनांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. उच्चस्तरीय समितीने प्राथमिक तपास अहवाल सादर केल्यानंतर सरकारने आपला आदेश स्थगित ठेवला. ३० एप्रिल रोजी राज्य सरकारने बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद आणि दिव्या फार्मसीच्या १४ उत्पादनांचे उत्पादन परवाने निलंबित केले होते. उत्तराखंड सरकारच्या परवाना प्राधिकरणानेही उत्पादनांवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला होता. पतंजली आयुर्वेदच्या उत्पादनांबाबत वारंवार दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध केल्यामुळे कंपनीचा परवाना बंद करण्यात आल्याचे त्यात म्हटले होते.
भावना दुखावल्याचा याचिकाकर्त्याचा दावा
याचिकाकर्ते यतीन यांनी दावा केला आहे की योगगुरू रामदेव यांनी स्वत: एका व्हीडीओमध्ये कबूल केले आहे की त्यांच्या उत्पादनात कटलफिशचा वापर केला जातो. असे असतानाही कंपनी चुकीचे ब्रँडिंग करून मंजनला शाकाहारी म्हणत आहे. कोर्टाला सांगण्यात आले की याचिकाकर्ता आणि त्याचे कुटुंब केवळ शाकाहारी पदार्थ वापरत असल्याने ते नाराज आहेत. पण जेव्हापासून त्यांना कळले की सीफोमचा वापर टूथपेस्टमध्ये केला जातो. त्याच्या भावना खूप दुखावल्या आहेत.