संग्रहित छायाचित्र
अयोध्येतील रामलल्ला मंदिराच्या छताला गळती लागल्याचं प्रकरण ताजं असतानाच एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. नवीन संसद भवनाच्या छताला गळती लागल्याचं या व्हिडीओ मध्ये दिसत आहे. त्यासोबतच छतावरून गळत असलेलं पाणी साठवण्यासाठी खाली एक ड्रम ठेवल्याचं देखील या व्हिडीओ मध्ये दिसत आहे.
हा व्हिडीओ तामिळनाडूमधील विरुधुनगरचे खासदार मणिकम टागोर यांनी पोस्ट केला आहे. संसदेच्या लॉबीमध्ये पाण्याची गळती सुरू असून ही लॉबी राष्ट्रपतींच्या वापरासाठी असल्याचं त्यांनी सांगितलं. नवी संसद बांधून एक वर्ष झाले आहे.
हाच व्हिडीओ रीट्विट करत सपाच्या अखिलेश यादव यांनी भाजपला टोला हाणला. यादव म्हणाले, या नव्या संसदेपेक्षा जुनी संसद चांगली होती. तिथे जुने खासदार देखील येऊन भेटू शकत होते. कोट्यवधी रुपयांच्या निधीतून उभारलेल्या नव्या संसदेत पाणी टपकण्याचा कार्यक्रम सुरू असेपर्यंत जुन्या संसद भवनात कामकाज पुन्हा का होऊ दिले जात नाही. भाजपा सरकारने बनविलेल्या प्रत्येक नव्या छताला गळती लागणे हे मुद्दामहून विचार करून केलेल्या डिझाईनचा भाग तर नाहीय ना असं जनता विचारत असल्याचं अखिलेश यादव यांनी म्हटलंय.