ताजमहलच्या गळतीवरून खासदार ओवेसींचा पुरातत्त्व विभागाला टोला, आहे त्या मालमत्ता सांभाळता येत नसल्याबद्दल व्यक्त केला रोष

मुंबई: ताजमहल हे भारतीय संस्कृतीच्या प्रतिकांपैकी एक आहे. भारतीय पुरातत्त्व विभाग ताजमहल पर्यटनाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमवतो. मात्र, त्यांना ताजमहलची योग्य ती देखभाल करता येत नाही. आता त्यांना वक्फची मालमत्ता सांभाळायची आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 16 Sep 2024
  • 05:01 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

मुंबई: ताजमहल हे भारतीय संस्कृतीच्या प्रतिकांपैकी एक आहे. भारतीय पुरातत्त्व  विभाग ताजमहल पर्यटनाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमवतो. मात्र, त्यांना ताजमहलची योग्य ती देखभाल करता येत नाही. आता त्यांना वक्फची मालमत्ता सांभाळायची आहे. हे म्हणजे १० वीत नापास झालेल्या विद्यार्थ्याने पीएचडीसाठी अर्ज करण्यासारखा प्रकार असल्याची टीका खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे ताजमहल परिसरात पाणी साचले असून तीन घुमटांपैकी मुख्य घुमटातून पाण्याची गळती सुरू झाली आहे. ताजमहल परिसरातील उद्यानात पाणी साचल्याचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक चर्चांनाही उधाण आले आहे. यावरून आता राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही यावरून पुरातत्त्व  विभागाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. असदुद्दीन ओवेसी यांनी एक्सवर पोस्ट करत या संदर्भात भाष्य केले आहे. पुरातत्त्व विभाग ताजमहलला सावत्र वागणूक देत आहे. हा तोच भारतीय पुरातत्त्व  विभाग आहे, ज्यांना वक्फ स्मारके त्यांच्या ताब्यात हवी आहेत. मात्र, ज्या वास्तू आता त्यांच्या ताब्यात आहेत, त्या त्यांना योग्य पद्धतीने सांभाळता येत नाहीत. हे म्हणजे १० वीत नापास झालेल्या विद्यार्थ्याने पीएचडीसाठी अर्ज करण्यासारखा प्रकार आहे, असे ते म्हणाले. 

गळतीवर पुरातत्त्व  विभागाचे म्हणणे काय?
आग्रा विभागाच्या पुरातत्त्व  खात्यामधील अधीक्षक प्रमुख राजकुमार पाटील यांनी सांगितले, ताजमहलमध्ये पाण्याची गळती होत असल्याची बातमी खरी आहे. आम्ही मुख्य घुमटाची तपासणी केली असून पावसामुळे ही गळती होत असल्याचे दिसून आले. तसेच ड्रोन कॅमेऱ्याने आम्ही घुमटाची तपासणी केली आहे. याशिवाय आग्रा येथील स्थानिक आणि सरकारमान्य गाईड असलेल्या मोनिका शर्मा यांनीही या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ताजमहल आग्रा आणि संपूर्ण देशाचा अभिमान आहे. ताजमहलमुळे आग्र्यातील हजारो लोकांना रोजगार मिळाला आहे. सरकारने ताजमहलची विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण येथील लोकांसाठी आणि पर्यटनासाठी ताजमहलचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.  दरम्यान, आग्रा येथे तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक भागात पाणी साचले आहे. पावसामुळे येथील एक राष्ट्रीय महामार्ग जलमय झाला आहे, काही भागातील शेतात तळे साचले असून पिके वाया गेली आहेत तर शहरात महाग घरे असलेल्या भागातही पाणी साचले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest