संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी बुधवारी भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. अनेकांनी यावर टीका केली असून न्यायपालिका आणि कार्यपालिकेमध्ये अंतर असायला हवे, अशी भावना व्यक्त केली आहे.
या भेटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास मगहाराष्ट्रीयन पेहराव केला होता. शर्ट, धोतर आणि टोपीमध्ये हातात आरती घेतलेले मोदी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या समवेत उपस्थित असल्याचे दिसते. चंद्रचूड यांचे महाराष्ट्राशी असलेले नाते, मोदींचा महाराष्ट्रीय पोशाख आणि महाराष्ट्र विधानसभेची तोंडावर आलेली निवडणूक याचा संबंध राजकारणाशी जोडला जात आहे. प्रत्येक राज्यातील निवडणुकीवेळी त्या त्या राज्यातील लोकांशी सांस्कृतिक संबंध जोडण्याची मोदी यांची खासियत अनेकवेळा दिसून आली असून यामागे राजकारण असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.
उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि या भेटीचा संबंध जोडला असून सत्तासंघर्षाचा खटला न्यायालयात त्यामुळेच प्रलंबित राहिला आहे का? असा सवाल विचारला आहे. विरोधकांच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यासाठी त्यांनी माजी सरन्यायाधीश के. जी. बाळकृष्णन आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा इफ्तार पार्टीतील फोटो पोस्ट केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, गणेशोत्सवाची देशभरात सर्वत्र धूम आहे. आस्थेने गणरायाचे पूजन केले जात आहे. बुधवारी गौरी-गणपतीतील महालक्ष्मी पूजा होते. देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी पंतप्रधानांनी गणरायाची आरती केली. तसेच महालक्ष्मी पूजन केले. सरन्यायाधीश महाराष्ट्रातील आहेत. दिल्लीत खास महाराष्ट्रीयन व्यक्तीकडूनच ते दरवर्षी गणरायाची मूर्ती पूजेसाठी आणतात. या भेटीने अचानक विरोधाची इकोसिस्टीम कार्यान्वित झाली असून जणू आभाळ कोसळले असल्याचे वातावरण तयार केले जात आहे. आता यात फरक फक्त इतकाच आहे की, आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित रहायचे. गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले तर इतका गहजब का?
फडणवीस पुढे म्हणतात, हिंदूत्त्वाला विरोध करता-करता आता गणपती आणि गौरी-महालक्ष्मींना विरोध करण्यापर्यंत यांची का मजल जावी? प्रश्न गहन आहे. हा महाराष्ट्रीयन सणांचा, महाराष्ट्र धर्माचा, मराठी संस्कृतीचा, गौरी-गणपतींच्या भक्ती आणि श्रद्धेचा अपमान नाही का?, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. तसेच १८ सप्टेंबर २००९ साली माजी सरन्यायाधीश केजी बाळकृष्णन यांनी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी आयोजित इफ्तार पार्टीला उपस्थित राहिल्याचे फोटोही पोस्टसह अपलोड केले आहेत.