संग्रहित छायाचित्र
लखनौ: बसपा (BSP) प्रमुख मायावती (Mayawati) यांनी मोठा निर्णय घेताना भाचा आकाश आनंद (Akash Anand) यांची रविवारी (दि. २३) पुन्हा उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती करत आपली चूक सुधारली. केली. तसेच राष्ट्रीय समन्वयकाची जबाबदारी सोपवली.
आकाश आता देशभरातील पक्षाचे काम पाहणार आहेत. मायावती यांनी रविवारी बसपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत याची घोषणा केली. आकाशही या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी मायावतींच्या पायाला स्पर्श केला तेव्हा मायावतींनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि नंतर आशीर्वाद दिला.
मायावतींनी लोकसभा निवडणुकीदरम्यान ७ मे रोजी आकाश यांना अपरिपक्व ठरवून पक्षाच्या सर्व महत्त्वाच्या पदांवरून काढून टाकले होते. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर मायावतींनी राष्ट्रीय कार्यकारिणीची पहिली बैठक बोलावली होती. ती तीन तास चालली. पोटनिवडणुकीसह आगामी सर्व निवडणुका लढविण्याबाबतही मायावती बोलल्या. याचा अर्थ आता यूपी विधानसभेच्या १० जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत पक्ष आपले उमेदवार उभे करणार आहे.
आकाश आनंद हे वडील अशोक कुमार आणि सतीश चंद्र मिश्रा यांच्यासोबत राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बसले होते. त्यांच्यासोबतच ते बैठकीला आले होते. या बैठकीला २०० हून अधिक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील बसपाचे पदाधिकारी उपस्थित होते. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा यांनी निवडणुकीतील पराभवाचा अहवाल मायावतींना सादर केला होता. या अहवालाबाबत मायावतींनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निर्देशही दिले.
बीएसपीने २१ जून रोजी उत्तराखंडमधील दोन जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यामध्ये आकाश यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यावेळी मायावतींचा आकाशवरील राग दूर झाल्याचा अंदाज वर्तवला जात होता. आकाश यांना सर्व पदे परत देऊन मायावतींनी स्पष्ट केले की, भविष्यात आता फक्त आकाशच पक्ष सांभाळतील.
बिहार बसपा प्रभारी व समन्वयक डॉ.लालजी मेधनकर बैठकीला उपस्थित होते. ते म्हणाले, ‘‘आता आम्ही पोटनिवडणूकही लढवू, असे मायावतींनी सांगितले आहे. फक्त यूपीच नाही तर देशात जिथे मजबूत आहोत तिथे आम्ही निवडणूक लढवू.’’