File Photo
#हिमाचल प्रदेश
काँग्रेसचे सरकार असलेल्या हिमाचल प्रदेशमध्ये मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे. आता २१ वर्षे वयाच्या आधी मुलीचे लग्न करणे गुन्हा ठरणार आहे. येथील काँग्रेस सरकारने मुलींच्या लग्नासंदर्भातील ‘हिमाचल प्रदेश बाल विवाह प्रतिबंधक विधेयक-२०२४’ संमत केले आहे. त्यामुळे सर्व धर्माच्या मुलींसाठी लग्नाचे कायदेशीर वय १८ वरून २१ वर्षे होणार आहे.
विधानसभेत मंजूर झालेले विधेयक आता राज्यपालांकडे पाठवण्यात आले आहे. त्या विधेयकाला राज्यपालांनी मान्यता दिल्यास मुलींच्या लग्नाचे कायदेशीर वय २१ वर्षे होईल. मुलींच्या लग्नाचे वय २१ करणारे हिमाचल प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. हिमाचल प्रदेशात मुलगा आणि मुलगी यांचे वय २१ वर्षे किंवा त्याहून अधिक असेल तेव्हाच विवाह वैध मानला जाईल. विधेयक सादर करताना हिमाचल प्रदेशाचे आरोग्य आणि महिला सक्षमीकरण मंत्री धनीराम शांडील म्हणाले की, बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ संमत करून बालविवाह रोखण्यासाठी तरतूद करण्यात आली होती. राज्यात स्त्री-पुरुष समानता आणि उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुलींच्या लग्नाचे किमान वय वाढवणे आवश्यक झाले आहे. यामुळे सध्या राज्यात मुलींच्या लग्नासाठी वयाची १८ वर्षे पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यात तीन वर्षांनी वाढ करून आता २१ वर्षे पूर्ण झाल्यावरच मुलीचा विवाह करता येणार आहे. या संदर्भातील निर्णयास मंत्रिमंडळाने सात वर्षांपूर्वी मंजुरी दिली होती.
मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू म्हणाले की, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात आमचे सरकार कठोर कारवाई करणार आहे. आम्ही या संदर्भात सभागृहात चर्चेसाठी तयार आहोत. परंतु विरोधक चर्चेतून पळ काढत आहेत. राज्यपालांनी या विधेयकास मंजुरी दिल्यावर तो राज्यातील सर्व नागरिकांना लागू होणार आहे. कोणत्याही धर्म किंवा जातीचा व्यक्ती असला तरी त्यांच्यासाठी हा कायदा लागू असणार आहे. एखाद्या समाजात कमी वयात लग्नाची प्रथा असेल तर ती त्यांना बंद करावी लागणार आहे. यामुळे आता हिमाचल प्रदेशात मुलगा किंवा मुलगी यांच्या लग्नाचे वय २१ वर्षे असणार आहे.वृत्तसंस्था