संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली: आम आदमी पक्षाच्या (AAP) खासदार स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांना काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या निवासस्थानी मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव बिभव कुमार यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला असून बिभव कुमार यांना पोलिसांनी अटक केलेली आहे.
या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. आता खासदार स्वाती मालीवाल यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना या घटनेबाबात पत्र लिहिले आहे. खासदार स्वाती मालीवाल यांनी इंडिया आघाडीतील काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना हे पत्र लिहिले आहे. तसेच इंडिया आघाडीच्या या नेत्यांकडे भेटीची वेळ मागितली असल्याचे स्वाती मालीवाल यांनी म्हटले आहे.
मी गेल्या १८ वर्षांपासून काम करत आहे. तसेच ९ वर्षामध्ये महिला आयोगात काम करत असताना तब्बल २.७ लाख केसेस ऐकल्या आहेत. तसेच कोणालाही न घाबरता आणि कोणाचीही भीती न बाळगता महिला आयोगाचे अतिशय चांगले काम केले. मात्र, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी मला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर आता माझ्या चारित्र्याची बदनामी करण्यात येत आहे. हे खूप खेदजनक आहे, असे स्वाती मालीवाल यांनी म्हटले.