वायनाडमध्ये भूस्खलन; ८० मृत्युमुखी

गेल्या काही दिवसांपासून देशभरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. केरळमध्ये तर पावसाने थैमान घातले असून मुसळधार पावसामुळे केरळच्या वायनाडमध्ये मंगळवारी पहाटे भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत ८० जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 31 Jul 2024
  • 11:40 am
National News, Heavy rain, Kerala, landslide has occurred in Kerala's Wayanad, 80 people have died, HEAVY RAIN

संग्रहित छायाचित्र

शेकडो लोक ढिगाऱ्याखाली?, एनडीआरएफ, निमलष्करी दलाच्या तुकड्यांकडून बचतकार्य सुरू, मृतांचा आकडा वाढणार

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून देशभरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. केरळमध्ये तर पावसाने थैमान घातले असून मुसळधार पावसामुळे केरळच्या वायनाडमध्ये मंगळवारी पहाटे भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत ८० जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्याला सुरुवात करण्यात आली आहे.

रेस्क्यू ऑपरेशनमध्ये आतापर्यंत ८० मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती केरळचे मुख्य सचिव व्ही. वेणू यांनी दिली आहे. भूस्खलनात ११६ लोक जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू असल्याची माहिती महसूलमंत्र्यांनी दिली आहे. दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांच्या नेतृत्वाखाली आपत्ती व्यवस्थापन आणि बचावकार्य सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार कुरियन हे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, निमलष्करी दल आणि राज्य सरकार आणि या बचावकार्यात सहभागी यंत्रांचे समन्वयक म्हणून काम करत आहेत.

वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडी भागात भूस्खलानाची ही घटना घडली आहे. या घटनेत दोन लहान मुलांचाही मृत्यू झाला आहे. तसेच शेकडो लोक या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या केरळमध्ये पावसाने थैमान घातले असून भूस्खलनात घडलेल्या ठिकाणी सुरू असलेल्या पावसामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत.  मेप्पाडी भागात मंगळवारी मध्यरात्री २ च्या सुमारात भूस्खलनाची पहिली घटना घडली. त्यानंतर पुन्हा पहाटे चारच्या सुमारास आणखी एक भूस्खलन झाले. दोन्हीही भूस्खलनाच्या घटनेत आतापर्यंत समोर आलेल्या वृत्तानुसार ८० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच अनेक लोक यामध्ये अडकल्याची शक्यता असून प्रशासनाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.  दरम्यान, भूस्खलनाच्या घटनेनंतर अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी संवाद साधत आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही दिली आहे. तसेच घटनास्थळी आरोग्य विभागाचे पथकही दाखल झाले असून बचावकार्यासाठी हवाईदलाचे दोन हेलिकॉप्टर्सही दाखल झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच सर्व प्रकारच्या  मदतीसाठी कंट्रोल रूमही सुरू करण्यात आली आहे. भूस्खलनाच्या घटनांमुळे झाडे मोठ्या प्रमाणात उन्मळून पडली आहेत आणि पुराच्या पाण्यामुळे हिरवेगार भाग नष्ट झाले आहेत. असंख्य संसार उद्ध्वस्त, सर्वत्र आक्रोश, नातेवाईकांचा शोध आणि बचावकार्य असे काहीशे चित्र या गावांमध्ये दिसत आहेत. केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलन आणि पावसामुळे चुरमला भागात इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शोध आणि बचाव कार्यासाठी लष्कराचे एक पथक कन्नूरहून भूस्खलनग्रस्त वायनाडला दाखल झाले आहे.

राष्ट्रीय आरोग्य मिशनने एक कंट्रोल रूम सुरू केले असून आपत्कालीन मदतीसाठी दोन  हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आले आहेत. एअर फोर्सचे दोन हॅलिकॉप्टर्स एमआय -१७ आणि एएलएच रेस्क्यू मिशनसाठी तैनात आहेत, पण मुसळधार पाऊस सुरू असल्याने त्यांना उड्डाण करणे शक्य होत नाही. काल रात्री वायनाडमध्ये भूस्खलन झाल्याचे ऐकून दु:ख झाले.  प्रभावित कुटुंबांना लवकरात लवकर मदत पोहोचवण्याची विनंती राज्य सरकारला करण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. 

पंतप्रधान मोदींनी केली मदत जाहीर 
वायनाडमधील भूस्खलनाच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक्सवर (ट्विट) पोस्ट करत केंद्र सरकार मदत कार्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, भूस्खलनाच्या घटनेमुळे आपण व्यथित झालो आहोत. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्या सर्वांसोबत आम्ही आहोत आणि जखमींबाबतही प्रार्थना करतो. सर्व बाधितांना मदत करण्यासाठी सध्या बचावकार्य सुरू आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि तेथील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल. आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदतही मोदी यांनी जाहीर केली आहे.  

केरळमधील ८ जिल्ह्यांना रेड अलर्ट 
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) केरळमधील चार जिल्ह्यांसाठी कोझिकोड, मलप्पुरम, वायनाड आणि कासारगोड रेड अलर्ट जारी केला. तर पठानमथिट्टा, अलप्पुझा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर आणि पलक्कडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

पाच वर्षांपूर्वी याच परिसरात झाले होते भूस्खलन
वायनाडमधील मुंडक्काई, चुरमाला, अट्टामाला आणि नूलपुझा या चार गावांमध्ये भूस्खलन झाले आहे. पाच वर्षांपूर्वी २०१९ मध्ये याच गावात अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाले होते, ज्यामध्ये १७ लोकांचा मृत्यू झाला होता. ५ जणांचा अद्याप शोध लागला नव्हता. ५२ घरे उद्ध्वस्त झाली होती.

मुंडक्काई गावात सर्वाधिक नुकसान, २५० लोक अडकले

भूस्खलनामुळे वायनाडमधील मुंडक्काई गाव सर्वाधिक प्रभावित झाले आहे. बचाव पथक अद्याप येथे पोहोचू शकलेले नाही. एनडीआरएफचे एक पथक पायी चालत येथे पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. मुंडकाईमध्ये सुमारे २५० लोक अडकल्याचे वृत्त आहे. येथे अनेक घरे वाहून गेली आहेत. येथे ६५ कुटुंबे राहात होती. जवळच्या चहा मळ्यातील ५५ कर्मचारीही बेपत्ता आहेत. वायनाड व्यतिरिक्त हवामान खात्याने आज कोझिकोड, मलप्पुरम आणि कासारगोडमध्येही रेड अलर्ट जारी केला आहे. म्हणजेच आजही येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे बचावकार्यात अडचणी येऊ शकतात.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest