संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली: खासगीकरण आणि आर्थिक प्रोत्साहन देऊन दर्जेदार शिक्षण मिळू शकत नाही. भाजपला या तत्त्वावर शैक्षणिक सुधारणा घडवून आणायच्या आहेत. मात्र आम्हाला संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करायची आहे. खासगीकरण करून आणि आर्थिक प्रोत्साहन देऊन सुधारणा कशा होतील, असा सवाल उपस्थित करत काँग्रेसचे नेते व लोकसभेमधील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांमधील फरक उलगडून सांगितला. राहुल गांधी यांनी नुकतेच आयआयटी मद्रासला भेट देत तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना राहुल गांधी यांनी थेट उत्तरे दिली.
यातील एका विद्यार्थ्याने राहुल गांधी यांना काँग्रेस व भाजपा कसे वेगळे आहेत, असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी या दोन पक्षांची विचारसरणी, कार्यपद्धतीतील तफावत स्पष्ट केली आहे. राहुल गांधी म्हणाले, काँग्रेस निष्पक्षपातीपणे काम करते, तर भाजप नेहमीच आक्रमक दृष्टिकोन ठेवून काम करत असते. काँग्रेस साधनसंपत्तीच्या समान वितरण आणि सर्वसमावेशक विकासावर विश्वास ठेवते, तर भाजपकडून आक्रमक रूपातील विकासावर लक्ष्य केंद्रित केले जाते. खासगीकरण आणि आर्थिक प्रोत्साहन देऊन दर्जेदार शिक्षण मिळू शकत नाही. संसाधनांचे वाटप अधिक समन्यायी पद्धतीने व्हायला हवे, असे आमच्या पक्षाचे मत आहे. विकास सर्वसमावेशक असावा. समाज जितका सुसंवादी असेल, लोक आपापसात जितके कमी भांडतील, तितकी देशाची परिस्थिती चांगली होईल, असा आमचा विश्वास आहे, असे सांगताना गांधी यांनी काँग्रेसची विचारसरणी स्पष्ट केली.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, भाजप आर्थिक दृष्टीने ट्रिकल डाऊनवर विश्वास ठेवतो. भाजपच्या मते साधनसंपत्तीवर लक्ष्य केंद्रित केले पाहिजे. ते आर्थिक दृष्टीने याला ट्रिकल डाऊन म्हणतात, तर आमच्या मते समाज जेवढा सामंजस्यपूर्ण आणि सौहार्दाने भरलेला असेल, लोक जेवढे कमी वाद घालतील, तेवढेच ते देशासाठी चांगले ठरेल. आयआयटी मद्रासमधील काही हुशार मुलांशी संवाद साधण्याचे भाग्य मला लाभले. यश म्हणजे नेमके काय, हे जाणून घेण्याचा आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न केला. भारताचे भवितव्य घडविण्यासाठी संशोधन, शिक्षणाची महत्त्वपूर्ण भूमिका आणि सर्वांसाठी समानता, नावीन्य आणि संधीला महत्त्व देणारी उत्पादन व परिसंस्था वाढवण्याची गरज यावरही आम्ही चर्चा केली. तरुणांना शिक्षित करण्यासाठी, चांगल्या उद्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि भारताला जागतिक स्तरावर अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी भारतीय शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल करण्याची गरज राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केली. आज आपल्या शिक्षणाच्या पायाभूत सुविधा अनेकदा तरुणांना डॉक्टर, इंजिनिअर, आयएएस, आयपीएस किंवा सशस्त्र दल अशा काही करिअरपुरत्या मर्यादित ठेवतात. त्यांच्या पुढे आणखी विविध प्रकारच्या संधी आणण्यासाठी व विद्यार्थ्यांना त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम करण्याची, बदल घडवून आणण्याची गरजदेखील त्यांनी व्यक्त केली.
सरकारी संस्थांच्या सक्षमीकरणाची गरज
ही चर्चा केवळ विचारांविषयी नव्हती, तर जागतिक स्तरावर भारताला समता आणि प्रगतीची शक्ती म्हणून प्रस्थापित करण्यासाठी आपण एकत्र कसे काम करू शकतो हे समजून घेण्याविषयी ही चर्चा होती. मुलांनी विचारलेले विचारपूर्वक प्रश्न आणि त्यांचा नवा दृष्टिकोन यामुळे हे खरोखरच प्रेरणादायी संभाषण झाले. जनतेला दर्जेदार शिक्षणाची हमी देणे ही कोणत्याही सरकारची सर्वात महत्त्वाची जबाबदारी असते, असे माझे मत आहे. खासगीकरण आणि वित्तीय प्रोत्साहनाद्वारे हे साध्य होऊ शकत नाही. शिक्षणावर अधिकाधिक पैसा खर्च करण्याची आणि सरकारी संस्था बळकट करण्याची गरज आहे, असे देखील राहुल गांधी म्हणाले.