प्रातिनिधिक छायाचित्र....
Chinese virus enters India | जगाला हादरवून सोडणाऱ्या कोविड-19 महामारीनंतर चीनमध्ये HMPV नावाचा विषाणू पसरला आहे. आता या विषाणूची पहिली केस बेंगळुरूमध्ये समोर आली आहे. बेंगळुरू येथील रुग्णालयात एका आठ महिन्यांच्या मुलीमध्ये HMPV विषाणू आढळून आला आहे.
आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, एका खासगी रुग्णलयाने केलेल्या चाचणीत या चिमुकलीला ह्यूमन मेटान्यूमोची लागण झाल्याचं दिसून आलं आहे. मात्र, सरकारद्वारे अद्याप कोणतीही चाचणी करण्यात आलेली नाही. यासंदर्भात बोलताना, खासगी रुग्णालयाच्या अहवालावर शंका उपस्थित करण्याचं कोणतंही कारण नाही, अशी प्रतिक्रिया आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे या चिमुकलीचा प्रवासाचा कोणताही इतिहास नाही. म्हणजे संबंधित रूग्ण चीन किंवा इतर कोठेही गेला नाही. रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत चिमुकलीच्या शरीरात एचएमपीव्ही विषाणू असल्याची पुष्टी झाली आहे. कर्नाटकच्या आरोग्य विभागाने ही माहिती केंद्र सरकारला दिली आहे.
या विषाणूची लक्षणे काय आहेत?
या विषाणूला ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस किंवा एचएमपीव्ही (HMPV) विषाणू म्हणतात, ज्याची लक्षणे सामान्य सर्दीसारखी असतात. सामान्य प्रकरणांमध्ये यामुळे खोकला किंवा घरघर, नाक वाहणे किंवा घसा खवखवणे अशी लक्षणे जाणवतात. एचएमपीव्ही संसर्ग लहान मुले आणि वृद्धांमध्ये गंभीर असू शकतो. या विषाणूमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्या लोकांमध्ये गंभीर आजार होऊ शकतो. योग्य काळजी घेतल्यास सध्याच्या परिस्थितीत घाबरण्याची काहीच गरज नसल्याचे आरोग्य विभागानं सांगितलं आहे.
असे बोलले जात आहे. या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये श्वास घेण्यास त्रास होणे आणि फ्लूसारखी लक्षणे दिसून येतात. आता दिल्लीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तसेच कर्नाटकच्या आरोग्य विभागानं विषाणूशी संबंधित आव्हानांचा सामना करण्यासाठी यासंदर्भात एक परिपत्रक जारी केलं आहे.
या परिपत्रकात विषाणूचा प्रसार रोखण्यासंदर्भात कोणती काळजी घ्यावी, याची माहिती देण्यात आली आहे. तसेच आरोग्य विभागाच्या अधिक्षक डॉ. वंदना बग्गा यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठकही घेतली.