File Photo
अयोध्येत श्रीरामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा क्षण अगदी जवळ येऊन ठेपला आहे. या मंदिरासाठी प्रत्यक्ष योगदान दिलेल्या तसेच हे मंदिर व्हावे अशी मनोमन इच्छा बाळगणाऱ्यांच्या स्वप्नपूर्तीचा क्षण आला आहे. हे केवळ श्रीरामाचे मंदिरच नाही तर राष्ट्रमंदिराचा हा प्रवास आहे. हा परकीय आक्रमणाचा कलंक होता. त्यामुळे बाबरीचा नुसताचा ढाचा नव्हे तर कलंकही तोडला, अशी भावना ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरीचा ढाचा पाडण्यात सहभागी झालेल्या पुण्यातील कारसेवकांनी व्यक्त केली.
कारसेवा करण्यासाठी पुण्यातून मोठ्या संख्येने रामभक्त १९९२च्या डिसेंबरमध्ये अयोध्येला गेले होते. त्यात लेखिका अर्पणा लळिंगकर यांचाही समावेश होता. ‘सीविक मिरर’कडे त्यावेळच्या आठवणी जागवताना कारसेविका लळिंगकर म्हणाल्या, ‘‘कारसेवेसाठी १ डिसेंबर १९९२ मध्ये आम्ही अयोध्येत पोहोचलो होतो. ६ तारखेपर्यंत अयोध्या परिसराची पाहणी करत होतो. रोज नवीन कारसेवक अयोध्येत दाखल होत होते. राम जन्मभूमीच्या ठिकाणी आम्ही जात होतो. तेथे सैनिकांचा मोठा फौजफाटा होता. त्यांनादेखील येथे राम मंदिर व्हावे, असे वाटत होते. राम जन्मभूमीचा इतिहास सांगितला जात होता. हिंदू विश्व परिषदेने उत्खननाची पूर्ण यादी परिसरात लावली होती. हा ढाचा मशीद म्हणून सांगितला जात होता. परंतु तेथे केवळ घुमट बसविण्यात आले होते. फक्त मंदिराचे अवशेष दिसत होते. आतडे तुटते म्हणतात, तशी आवस्था झाली होती. त्यामुळे डोळ्यातून अश्रू येत होते. श्रीरामाची सुटका व्हावी, असे वाटत होते. ६ डिसेंबरलाच ही भावना सत्यात उतरली. बाबरी ढाचा पाडण्यात आला. सेवा पूर्ण झाली होती. सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. दिवाळी साजरी केली जात होती. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी दिवाळी साजरी केली. ती कधीही आयुष्यात विसरता येणार नाही.’’
नुसते राम मंदिर बांधून उपयोग नाही तर ते पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला रामायणाचा इतिहास पोहोचवायचा आहे. जगभरात रामायणाचा बोलबाला आहे. आपल्या पुढच्या पिढीला ते माहिती झाले पाहिजे. मंदिराची जी संकल्पना आहे, ती म्हणजे पावित्र, स्वच्छता आणि प्रसन्नता हे आपल्या देशात आणायचे आहे. हे झाल्यानंतर आपल्या देशाचे राष्ट्रमंदिर होईल, अशी भावनादेखील लळिंगकर यांनी व्यक्त केली.
२५ फुटावरून खाली पडलो तरीही...
कारसेवेत काहीही करून सहभागी होणार असल्याचा हट्ट घरी धरला होता. त्यानंतर १९९२ मधील कारसेवेत अगदी १७ व्या वर्षी सहभागी झालो. ३ तारखेला अयोध्येत उतरलो. बाबरीचा ढाचा तोडायचाच, असा निश्चय मनात केला होता. बाबरी ढाचा पाडल्यानंतर हे गुलामगिरीचे प्रतीक तोडण्याची भावना प्रत्येक कारसेवकाच्या मनात होती. मात्र असे कोणतेही नियोजन करण्यात आले नव्हते. कल्याणसिंग सरकारने आमची निवासाची व्यवस्था केली होती. देशातून शिलापूजन करून विटा मागवल्या होत्या. त्या विटांचे पूजन करायचे, असे ठरले होते. त्यामुळे ढाचा पाडण्याचा कोणताही विषय तेथे नव्हता. ६ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष सभेला सुरुवात झाली त्यावेळी नेत्यांची भाषणे सुरू होती. एका भाषणा दरम्यान आंध्र प्रदेशातील कारसेवक बाबरीच्या घुमटावर चढले. ते ‘जय श्री राम...’ ‘जय श्री राम’ असा जयघोष करत होते. त्यांच्या घोषणेमुळे वातावरण बदलले. एक-एक करून कारसेवक त्या घुमटावर चढले. हातात मिळेल ते घेऊन घुमट पाडण्याचा प्रयत्न करत होते. त्याच वेळी एक दोर धरून घुमटावर चढण्याचा प्रयत्न करत होतो. त्यात मीदेखील होतो. मात्र वरील कारसेवकाच्या हातातून तो दोर सुटला अन् मी सुमारे २५ फुटावरून खाली कोसळलो. पण मला कोणतीही जखम झाली नाही. पुन्हा मोठ्या जोशाने हातात हातोडी घेऊन दोर धरून घुमटावर चढलो. बाबरीचा ढाचा पडत होता, तसा तेथील उत्साह मोठ्या प्रमाणात वाढत होता. शेवटचा घुमट ४.३० वाजता तोडण्यात आला. त्यानंतर दिवाळी साजरी करण्यात आली.
आज श्री राम ५०० वर्षांनी येत आहेत. खूप मोठा आनंदाचा क्षण आहे. शब्दांत व्यक्त न करता येणाऱ्या भावना मनात आहे, अशी आठवण बाबरीचा ढाचा पाडण्यात सहभागी झालेल्या आमोद अग्निहोत्री या कारसेवकाने ‘सीविक मिरर’ला सांगितली. राम मंदिर सिर्फ झांकी हैं, काशी-मथुरा अभी बाकी आहे. असे सांगत पुढच्या काळात येथेही भव्य मंदिरे उभी राहतील असा विश्वासही अग्निहोत्री यांनी व्यक्त केला.
देशावर अनेक परकीय आक्रमणे झाली. परंतु या देशाची अस्मिता कधीही बुजली नाही. ही हिंदू वीरांची गाथा आहे. तब्बल ३ हजार महिलांनी यासाठी बलिदान दिले आहे. कारसेवेसाठी आम्ही ६ दिवस आधीच पोहोचलो होतो. तेथे गेल्यानंतर तीर्थक्षेत्रांना भेट देत होतो. रोज संध्याकाळी सत्संग, सभा आयोजित केल्या जात होत्या. नवा घाट येथे आमची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. बाबरीचा ढाचा पाडण्याचा कोणताही विषय नव्हता. केवळ पूजन करायचे एवढे ठरले होते. ६ डिसेंबर रोजी सभा सुरू झाली त्यावेळी मन घट्ट करून आम्ही सभा ऐकत होतो. त्यावेळी एक क्षण असा आला की डोळ्याचे पाते लवते ना लवते तेवढ्यात ‘जय श्री राम’ असा जयघोष करण्यात येऊ लागला. तेवढ्याच त्वेषाने एक एक जण बाबरी ढाचाच्या घुमटावर चढू लागला. जिवाच्या आकांताने ढाचावर चढून ती पाडली जात होती. त्याच वेळी नाचतही होते. परकीय आक्रमणाचा कलंक आमच्या डोळ्यासमोर तोडला जात होता, याचा आनंद होत होता. ढाचा पडत असताना कोणालाही दुखापत झाली नाही. सोबत असलेल्या सेवकांची काळजी घेण्यासाठी आम्ही पुढे आलो. अखेरचा घुमट पडल्यानंतर कारसेवा संपली, असे जाहीर करण्यात आले. प्रत्येकाला घरी जाण्याचे आदेश देण्यात आले. तेथून परततानाचा खूप मोठा आनंद होता. मात्र रस्त्यात पाण्याची व्यवस्था होऊ दिली नव्हती. अयोध्येतील लोकांच्या घरी राहणाऱ्या कारसेवकांना पोलिसांनी पहाटे उचलण्यास सुरुवात केली होती. काही काळ मीदेखील भूमिगत होतो. आता खूप मोठा सोहळा साजरा होत आहे. आनंदाचा क्षण जवळ आला आहे. देशात उत्साहाचे वातावरण आहे, असे बजरंग दलाचे तत्कालीन पुणे महानगर संयोजक शरद गंजीवाले यांनी सांगितले.