संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली: बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील दोन दोषींच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि. १९) नकार दिला.
न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने ही याचिका चुकीची असल्याचे नमूद केले. ‘‘ही कोणत्या प्रकारची याचिका आहे... ती अजिबात ऐकण्यास योग्य नाही. दोषींना मुदतपूर्व सुटकेसारखा कोणताही लाभ दिला जाणार नाही,’’ असे यावेळी न्यायालयाने स्पष्ट केले.
२०२२ मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी बिल्किसवर बलात्कार करणाऱ्यांची तेथील राज्य सरकारने तुरुंगातून सुटका केली होती. १ आणि ५ डिसेंबर रोजी गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्यापूर्वी स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ ऑगस्ट रोजी गुजरात सरकारने बिल्किसच्या बलात्काऱ्यांची मुदतपूर्व सुटका केली होती.
यंदा ८ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने बिल्किस बानो प्रकरणातील दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याचा राज्य सरकारचा निर्णय रद्द केला होता. मार्चमध्ये या निर्णयाविरोधात दोषी राधेश्याम भगवानदास आणि दोषी राजूभाई बाबुलाल सोनी यांनी याचिका दाखल केली होती. त्यांच्या सुटकेबाबत नवीन निर्णय होईपर्यंत त्याला अंतरिम जामीन मंजूर करावा, अशी विनंती करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलेल्या निर्णयात ही याचिका फेटाळून लावली.वृत्तसंंस्था