मोहन भागवत
नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. शरद पवार यांच्यानंतर आता त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्यांची सुरक्षा व्यवस्था आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याप्रमाणेच केली जाणार आहे.
या संदर्भात नुकतेच गृह मंत्रालयाकडून परिपत्रक काढण्यात आले. ज्यामध्ये असे आढळून आले की, भाजपची सत्ता नसणाऱ्या राज्यांत त्यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा दिसून आला आहे. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
मोहन भागवतांना आधी झेड प्लस सुरक्षा होती, त्यात वाढ करून हे सुरक्षाकवच आता ऍडव्हान्स सिक्युरिटी लाइजन (एएसएल) करण्यात आले आहे.भागवत यांच्या झेड प्लस सुरक्षेत सीआयएसएफच्या प्रतिनियुक्तीवरील अधिकारी आणि अंगरक्षकांचा समावेश होता.
मात्र केंद्रीय गृहमंत्रालयाच्या माहितीनुसार, सरसंघचालकांना कट्टर इस्लामी संघटनांकडून धोका आहे. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही वाढल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गृह मंत्रालयाने मोहन भागवत यांना 'एएसएल संरक्षित व्यक्ती' म्हणून घोषित केले आहे.
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या बाबत अधिकृतपणे माहिती देण्यात आली आहे. एएसएल सुरक्षेअंतर्गत, संबंधित व्यक्तीच्या संरक्षणाशी जबाबदारीत संबंधित जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य आणि इतर विभाग यांसारख्या स्थानिक संस्थांचा सहभाग अनिवार्य असतो. त्यात बहुस्तरीय सुरक्षा प्रणालीचा समावेश असतो. हेलिकॉप्टर प्रवासाची परवानगी केवळ खास रचना असलेल्या हेलिकॉप्टरमधूनच दिली जाते.
दरम्यान मोहन भागवत यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्याआधी केंद्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करत त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा दिली आहे.