संग्रहित छायाचित्र
कोलकाता: विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पश्चिम बंगालच्या चोप्रा ब्लॉक येथे एका जोडप्याला भररस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे मारहाण करणारा व्यक्ती तृणमूल काँग्रेसच्या आमदाराच्या जवळचा आहे. या आमदाराने मुस्लीम राष्ट्रात अशाच शिक्षा होत असतात, असे विधान करत या सगळ्या गोष्टींचे जाहीर समर्थन केले आहे. हे प्रकरण आता राष्ट्रीय महिला आयोगापर्यंत पोहोचले असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस आणि भाजपने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
सदर व्हीडीओत मारहाण करणारा आरोपी ताजिमूल इस्लाम उर्फ जेसीबी याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील चोप्रा विधानसभेचे तृणमूल काँग्रेसचे आमदार हमीदूल रहमान यांचा निकटवर्तीय असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर घटना समोर आल्यानंतर आमदार हमीदूल रहमान यांनी एक वादग्रस्त विधान केले असून आता विरोधकांनी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला घेरले आहे. पोलिसांनी रविवारी (३० जून) आरोपी ताजिमूलला अटक केल्यानंतर आमदार हमीदूल रहमान यांनी ज्या महिलेला बेदम मारहाण झाली, तिलाच दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. ताजिमूलशी कोणतेही संबंध नसल्याचे सांगून त्यांनी हात झटकले असले तरी या कृत्याचे मात्र त्यांनी अप्रत्यक्षरित्या समर्थन केले. पीडित महिलेचे कृत्य समाजविरोधी असल्याचे ते म्हणाले. तसेच हा विषय त्या गावातील असून त्याचा आणि पक्षाचा काडीचाही संबंध नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना तृणमूल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कनय्यालाल अग्रवाल म्हणाले की, मारहाण करण्यात आलेल्या स्त्री आणि पुरुषाचे विवाहबाह्य संबंध होते. हे परिसरातील लोकांना अमान्य होते. म्हणून सभा घेण्यात आली होती. परंतु, ताजिमूलने जे केले त्याचे आम्ही समर्थन करत नाही. आम्ही त्याच्याही भूमिकेची चौकशी करणार आहोत.
अखेर जोडप्याला मिळाले पोलीस संरक्षण
बंगाल पोलिसांनी दिलेल्या निवेदनानुसार, या जोडप्याला पोलीस संरक्षण पुरवण्यात आले आहे. ताजिमूल इस्लाम उर्फ जेसीबी याला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. इस्लामपूरचे जळवा पोलीस अधीक्षक जॉबी थॉमस के यांनी व्हायरल झालेल्या व्हीडीओची खातरजमा करून गुन्हा नोंदवला आहे. विशेष म्हणजे ताजिमूल इस्लाम उर्फ जेसीबी या जोडप्याला अमानुषपणे मारहाण करत होता त्यावेळी शेकडो लोक तिथे बघ्याची भूमिका घेऊन बसले होते.
राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली प्रकरणाची दखल
उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील लक्ष्मीकांतपूर येथील दुर्घटनेचा करावा तेवढा निषेध कमी आहे. केवळ विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरून महिलेला भर चौकात शेकडो लोकांच्या देखत अमानुष मारहाण होते, हाच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचा पुरावा आहे. आम्ही या प्रकरणाची दखल घेतली असून ४ जुलै रोजी या विषयावर सुनावणी होणार आहे. बंगालमधील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना हा चिंतेचा विषय असल्याचेही राष्ट्रीय महिला आयोगाने म्हटले आहे.
बॅनर्जी यांच्या राजवटीचा भेसूर चेहरा !
भाजप आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या राजवटीचा भेसूर चेहरा या निमित्ताने पुन्हा दिसला आहे. व्हायरल व्हीडीओत मारहाण करणारा आरोपी हा स्वतःला न्यायदूत समजतो. चोप्राचे आमदार हमीदुल रहमान यांचा तो विश्वासू सहकारी आहे. पश्चिम बंगालच्या प्रत्येक गावात संदेशखालीप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या महिलांसाठी शाप बनल्या आहेत. ज्याप्रमाणे शेख शाहजहानसाठी ममता बॅनर्जी उभ्या राहिल्या होत्या. त्याचप्रमाणे या प्रकरणातील आरोपीला वाचवण्यासाठी त्या आता पुढे येतील का, असा प्रश्न उपस्थित करत अमित मालवीय यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली.
व्हीडीओ काढणारा गाव सोडून निघून गेला
आरोपी ताजिमूल इस्लाम उर्फ जेसीबी हा तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. व्हीडीओत तो एका तरुण महिलेला भर रस्त्यावर मारहाण करत असल्याचे दिसते. विशेष म्हणजे मारहाणीच्या व्हीडीओत तो तरुणीला अतिशय अमानुषपणे मारताना दिसत आहे. तो मारहाण करताना आधी कुणीही तरुण-तरुणीला वाचवण्यासाठी येताना दिसत नाही. नंतर काहीजण तिथे येतात. पण तेसुद्धा तरुण-तरुणीला वाचवण्यात यशस्वी होत नाहीत. हा व्हीडीओ ज्याने कॅमेऱ्यात कैद केलाय त्याने चोरून तयार केला आहे. आरोपी ताजिमूल इस्लाम उर्फ जेसीबी हा सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता असल्याने व्हीडीओ बनवणारा भीतीमुळे गावाबाहेर पळून गेला आहे. अनेक लोकांनी हा व्हीडीओ पोस्ट केला होता, पण त्यांच्यावर दबाव आणल्यामुळे त्यांना व्हीडीओ डिलिट करावा लागला आहे.
म्हणाले 'मुस्लीम राष्ट्रांत अशाच शिक्षा होत असतात !
प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार रहमान म्हणाले, “आम्ही या घटनेचा निषेध करतो, पण त्या महिलेनेही चुकीचे कृत्य केले. तिने स्वतःचा नवरा, मुलगा आणि मुलीला सोडून दिले आणि ती दुष्ट बनली. अशा कृत्याविरोधात मुस्लीम राष्ट्रात काही नियम आणि न्याय पद्धती आहे. तरीही जे झाले ते थोडे अती होते. आता या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणी दिला?- अधीर रंजन चौधरी
राज्यात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून विरोधकांवर सर्रास हल्ले होत आहेत. तृणमूल काँग्रेसचे गुंड दिवसाढवळ्या हिंसाचार करताहेत. संबंधित जोडप्याला त्यांच्या अनैतिक संबंधाबाबत कायद्याच्या चौकटीत जाब विचारायचा होता. भर चौकात त्या दोघांना अमानुष मारहाण करण्याचा अधिकार जेसीबीला कोणी दिला होता? विशेष म्हणजे तृणमूलच्या आमदार या गुंडांचे समर्थन करत आहेत, ही लज्जास्पद गोष्ट आहे. ममता बॅनर्जी स्वतः महिला असताना एखाद्या महिलेला चौकात तालिबानी शिक्षा होते, हा राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा पुरावा आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी आणि आमदारांनी तत्काळ माफी मागावी अशी मागणी अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे.
भारतात इस्लामी शिक्षा कशी काय?
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे बंगाल प्रदेशाध्यक्ष सुकांता मुजूमदार यांनी आमदार रहमान यांच्या 'मुस्लीम राष्ट्र' या विधानावर चिंता व्यक्त केली. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी रहमान यांच्या विधानाचा व्हीडीओ शेअर केला आहे. आमदार रहमान यांनी मुस्लीम राष्ट्राचा दाखला देऊन कोणत्यातरी कायद्याप्रमाणे शिक्षेचे प्रावधान असल्याचे म्हटले. लोकशाही आणि राज्यघटना अमलात असलेल्या भारतासारख्या देशात मुस्लीम देशांतील शिक्षा होतात याचा अर्थ मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राज्यात कोणता कायदा लागू होतो, याची चौकशी करण्याची गरज आहे. हा गंभीर चिंतेचा विषय असल्याचे मुजूमदार यांनी म्हटले आहे.
दीदींच्या राज्यात महिला असुरक्षित- जे. पी. नड्डा
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या स्वतः एक महिला आहेत. त्यांच्या पक्षाचे गुंड महिलेला भर रस्त्यावर अशी मारहाण करत असतील आणि त्यांचे आमदार या मारहाणीचे समर्थन करत असतील तर काय म्हणावे, असा सवाल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी एक्सवर उपस्थित केला आहे. ताजिमूल इस्लाम उर्फ जेसीबी हा लक्ष्मीपूर ग्रामपंचायतीचा सर्वेसर्वा आहे. जेसीबीच्या विरोधात कुणीही स्थानिक नागरिक कॅमेऱ्यासमोर त्याच्याबाबत बोलायला तयार नाहीत. इतकी त्याची दहशत आहे. गावातील सर्वजण घाबरले आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर काय माध्यमांसमोरही जेसीबीबद्दल बोलायला तयार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या जेसीबीच्या विरोधात अनेक हत्येचे गुन्हे दाखल आहेत.