युवकाने थेट कोब्रा जातीच्या नागाला तोंडात धरून व्हीडीओ काढण्याचा प्रयत्न
हैदराबाद: तेलंगणात एका २० वर्षीय युवकाने थेट कोब्रा जातीच्या नागाला तोंडात धरून व्हीडीओ काढण्याचा प्रयत्न केला. व्हीडीओ तर बनला, पण सदर युवकाला आपले प्राण गमवावे लागले आहेत.हल्ली रील बनवण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण करत असतात. नको ते धाडस जिवावर बेतू शकते, हे माहीत असतानाही अनेकजण सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी नको ते व्हीडीओ बनवण्याचे धाडस करतात.
अशा घटना दिवसेंदिवस समोर येतात. सोशल मीडियावर असे व्हीडीओ व्हायरल होतात. तरीही रोज कुणी ना कुणी जिवाशी खेळ करणारे व्हीडीओ करतात. तेलंगणात घडलेल्या या घटनेतील मृत तरुणाचे नाव शिवराज असल्याचे सांगितले जाते. व्हायरल झालेल्या व्हीडीओमध्ये शिवराज आपल्या तोंडात कोब्रा नाग धरून रस्त्याच्या मधोमध उभा असल्याचे दिसत आहे.
नागाचे डोके शिवराजने त्याच्या तोडात धरले आहे. शिवराज कॅमेऱ्यात पाहून हात जोडताना दिसतो, तसेच मधे-मधे तो आपल्या केसांवरूनही हात फिरवतो. दरम्यान नाग आपली सोडवणूक करण्यासाठी शेपटी हलवताना दिसून येत आहे. व्हीडीओ संपवताना शिवराज चित्रीकरण करणाऱ्या व्यक्तीला अंगठा दाखवतो आणि तिथे व्हीडीओ संपतो.
तेलगू स्क्राइब या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, शिवराज आणि त्याचे वडील सापांना मारून आपली उपजीविका चालवतात. हा नाग या बाप-लेकांनीच पकडला होता. तसेच वडिलांच्या सांगण्यावरून शिवराजने नागाला तोंडात धरून रील बनवायला घेतले. मात्र व्हीडीओ संपवून नागाला तोंडातून बाहेर काढताना नागाने शिवराजला दंश केला. ज्यात त्याचा मृत्यू झाला.