भाजपचे भ्रष्ट वर्तन तुम्हाला कसे चालते, केजरीवाल यांचा आरएसएस प्रमुख भागवतांना सवाल

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था आहे. या संस्थेच्या जोरावर हा पक्ष सत्ताप्राप्तीचे उद्दिष्ट पूर्ण करू शकला आहे. ज्या आईच्या सामर्थ्याच्या जोरावर मुलगा हिंडायला- फिरायला आणि बागडायला लागला

Rashtriya Swayamsevak Sangh, parent organization Bharatiya Janata Party, power achievement, organizational strength.

नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था आहे. या संस्थेच्या जोरावर हा पक्ष सत्ताप्राप्तीचे उद्दिष्ट पूर्ण करू शकला आहे. ज्या आईच्या सामर्थ्याच्या जोरावर मुलगा हिंडायला- फिरायला आणि बागडायला लागला. तो मुलगा आता गरज संपल्यासारखे आईवर डोळे वटारू लागला आहे. आईलाच धमकावत आहे, हे वर्तन आरएसएसप्रमुख मोहन भागवतांना मान्य आहे का? असा सवाल दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर केजरीवाल यांनी आज जंतरमंतरवर जनता की अदालत घेतली. यात त्यांनी विविध विषयांवर सविस्तर भाष्य केले. लोकसभेतील सत्ता समीकरणे बदलली. ४०० पारचा नाराच बुमरँग झाला. भाजपला स्वबळावर सत्तेची मॅजिक फिगर काही गाठता आली नाही. नितीशबाबू आणि चंद्राबाबू हे दोन सत्तादूत धावून आले. भाजपने आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सूर जुळवले आहेत, पण लोकसभा रणसंग्रामापूर्वी झारखंडमधील एका सभेत भाजप अध्यक्षांनी तर आरएसएसचे महत्त्व  किती आणि काय हे अधोरेखित केले होते.

आता नेमका तोच धागा अरविंद केजरीवाल यांनी पकडला आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संबंधांवर तिखट प्रहार करताना त्यांनी मोहन भागवत यांच्या हृदयाला हात घातला आहे. भाजपमध्ये आजच्या घडीला सर्वाधिक भ्रष्टाचारी आहेत. मोदींनी या नेत्यांना पक्षात प्रवेश दिला आहे. मोदी आणि शाह या जोडगोळीने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच आपल्या वळचणीला घेतले आहे. असे भ्रष्टाचारी लोक घेऊन सरकार बनवण्यासाठी आजवर स्वयंसेवकांनी संघर्ष केला होता का? हे सगळे संघ कसे सहन करतो, ही अनैतिक गोष्ट मोहन भागवतांना कशी काय चालते, असेही प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

जे. पी. नड्डा यांच्या या शेखीवर तुम्हाला दुःख होत नाही का? असा प्रश्न त्यांनी आरएसएस आणि भाजपच्या लोकांना विचारला आहे. अशी शेरेबाजी ही दोन्हींच्या संबंधांना ठेच पोहोचवणारी असल्याचे केजरीवाल म्हणाले. त्यांनी भाजप हा आरएसएसवर दादागिरी करत असल्याचा टोला लगावला आहे.ईडी, सीबीआयसारख्या घटनात्मक संस्थांना हाताशी धरून विरोधी पक्षांना कमकुवत करण्याचे काम मोदी सरकार करत आहेत.

ही कुठली लोकशाहीवादी कार्यपद्धती आहे.  पंतप्रधान मोदी हे आमिष देऊन, ईडी आणि तपास यंत्रणांची दहशत दाखवत विरोधी गोटातील नेत्यांना धमकावतात. विरोधी पक्षांची लोकनियुक्त सरकार पाडत आहेत. लोकशाहीसाठी असे प्रकार योग्य आहेत का? असा खडा सवाल उपस्थित करत केजरीवाल यांनी अशा उद्दाम राज्यकर्त्यांचे कान उपटण्याचे आवाहन संघाला केले आहे. दरम्यान केजरीवाल यांच्या या वक्तव्याने शिळ्या कढीला पुन्हा ऊत आला आहे.

आरएसएस आणि भाजप यांच्यात एकोपा असल्याचे जे लोक मानतात, त्यांना केजरीवाल यांचे वक्तव्य झोंबले आहे. मी प्रामाणिक असलो तरच मला मतदान करा. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले म्हणून मी राजीनामा दिला. आता मी पुन्हा जनतेत जाणार आणि माझी भूमिका मांडणार आहे. लोकांना पटले तर ते पुन्हा माझ्या पक्षाला सत्ता देतील, असेही त्यांनी नमूद केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest