'हॅलो यूपीआय' आता फोन करा अन् पैसे पाठवा; फोन कॉल करून पाठवता येतील पैसे; इंटरनेटचीही नाही गरज

डिजिटल इंडियाच्या माध्यमातून देशातील यूपीआय पेमेंट सुविधा दिवसेंदिवस प्रगती करत आहे. केवळ भारतातच नाही, तर जगभरातील कित्येक देशांमध्ये आता यूपीआय पेमेंट करता येत आहे. ही सुविधा आणखी यूजर फ्रेंडली बनवण्यासाठी आता नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) एक नवीन फीचर लाँच केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Fri, 8 Sep 2023
  • 02:10 pm

संग्रहित छायाचित्र

डिजिटल इंडियाच्या माध्यमातून देशातील यूपीआय पेमेंट सुविधा दिवसेंदिवस प्रगती करत आहे. केवळ भारतातच नाही, तर जगभरातील कित्येक देशांमध्ये आता यूपीआय पेमेंट करता येत आहे. ही सुविधा आणखी यूजर फ्रेंडली बनवण्यासाठी आता नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) एक नवीन फीचर लाँच केले आहे.

आता वापरकर्त्यांना केवळ फोन कॉलच्या माध्यमातून पैसे हस्तांतरित करता येणार आहेत. विशेष म्हणजे, यासाठी इंटरनेटचीही गरज नसेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी 'ग्लोबल फिनटेक फेस्ट' मध्ये याबाबत घोषणा केली. यासोबतच, यूपीआयबाबत आणखी नवे फीचर्स देखील यावेळी लाँच करण्यात आले. 'हॅलो यूपीआय' हे फीचर एनपीसीआयने लाँच केले आहे. या माध्यमातून पैसे पाठवण्यासाठी वापरकर्ते आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून  एका ठराविक नंबरवर कॉल करू शकतात. यासाठी विविध बँकांसाठी वेगवेगळे नंबर देण्यात आले आहेत. या नंबरवर कॉल करून, आपल्या बँकेचे नाव सांगावे लागणार आहे. सोबतच, ट्रान्झॅक्शनचा प्रकार सांगून, शेवटी यूपीआय पिनच्या मदतीने पेमेंट करता येणार आहे.  ही सुविधा सध्या केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. लवकरच यात अन्य भाषादेखील येतील, असे एनपीसीआयने स्पष्ट केले आहे. या प्रकारच्या पेमेंटसाठी एआयचा वापर देखील करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. सध्या हॅलो यूपीआयच्या माध्यमातून केवळ १०० रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येणार आहेत.

आणखी एक सेवा सुरू

यासोबतच यूपीआयवर क्रेडिट लाईन हे फीचरही लाँच करण्यात आले आहे. या माध्यमातून यूजर्सना बँकांकडून प्री-अप्रूव्ह्ड लोन मिळू शकते. सोबतच, आधीपासून घेतलेल्या कर्जाच्या साहाय्याने यूपीआय प्लॅटफॉर्मवर ट्रान्झॅक्शन करता येईल. यासोबतच 'लाईट एक्स' नावाची आणखी एक सेवा एनपीसीआयने सुरू केली आहे. इंटरनेट शिवाय व्यवहार करण्यासाठी याचा वापर करता येईल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story