संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली: उत्तर प्रदेश राज्य सरकारकडून राज्यातील कावड यात्रेच्या मार्गावर असलेल्या सर्व भोजनालयांच्या मालकांनी आपापली नावे दर्शनी भागात लावावीत, असा आदेश देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशनंतर उत्तराखंड आणि उज्जैन महानगरपालिकेनेही अशाच प्रकारचा आदेश काढला आहे. दरम्यान आता या मार्गावरील व्यावसायिकांच्या पाट्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमकी सुरू झाल्या आहेत. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे सत्ताधारी हिंदुत्वाचा मुद्दा उकरून काढत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे, तर सत्ताधाऱ्यांनी कावड यात्रेतील भाविकांच्या श्रद्धांचा विषय असल्याने या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे.
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्य सरकारनंतर उज्जैन महानगरपालिकेनेही असाच एक निर्णय घेतला आहे. दुकानदारांनी त्यांचे खरे नाव दुकानावर जाहीर करावे, असे आदेश देण्यात आले आहेत. जे व्यावसायिक नियमाचे उल्लंघन करतील त्यांना २,००० रुपयांचा दंड भरावा लागेल. जर त्याच दुकानदाराने पुन्हा गुन्हा केल्यास त्याला ५ हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. उज्जैन हे धार्मिक शहर आहे. लोक येथे आस्था घेऊन येतात. त्यामुळे त्यांना दुकानाचा मालक कोण आहे? हे जाणून घेण्याचा पूर्ण हक्क आहे. त्यांच्या आस्थेचा प्रश्न आहे. ग्राहकांची दिशाभूल किंवा फसवणूक होऊ नये, यासाठी हा निर्णय योग्य असल्याचे सांगत उज्जैनचे महापौर मुकेश टटवाल यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे.
हे आहेत विरोधकांचे आक्षेप...
कावड यात्रेच्या मार्गावरील दुकानांच्या पाट्या बदलण्याबाबत जो निर्णय घेतला गेला, त्यावर विरोधकांकडून टीका होत आहे. अनेक विरोधी नेत्यांनी या निर्णयावर टीका केली आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारचा हा निर्णय भारतातील मुस्लिमांबद्दलचा द्वेष वाढवणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशातील कावड मार्गांवर भीती: हे भारतीय मुस्लिमांच्या द्वेषाचे वास्तव आहे. या द्वेषाचे श्रेय राजकीय पक्षांना, हिंदुत्वाच्या नेत्यांना आणि तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांना जाते, असे त्यांनी एक्सवर म्हटले आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांनीही योगी आदित्यनाथ सरकारवर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेश सरकार असे आदेश देऊन भारताच्या राज्यघटनेचा नाश करत आहे. संपूर्ण समाजाचा अपमान होत आहे.
ते समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. अशा प्रकारे जर्मनीत नाझींनी लक्ष्य केले होते. मी याचा निषेध करते, असे करात म्हणाल्या आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही यावर टीका केली आहे. भाजप देशातील एकता संपवत असल्याचे ते म्हणाले आहेत. आता तुम्ही (भाजप) खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर जात आणि धर्मावर आधारित नेमप्लेट लावण्याचे निर्देश देत आहात? तुम्हाला देशाचे विभाजन करायचे आहे का? तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. तुम्ही देशाची एकात्मता भंग करत आहात, असे राऊत म्हणाले.
रामदेव लाजत नाही मग रेहमान का लाजतोय?
योगगुरू आणि उद्योजक बाबा रामदेव यांनी मात्र उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारच्या यात्रेसंबंधी काढलेल्या आदेशाला पाठिंबा दिला आहे. प्रत्येकाला आपल्या नावाचा अभिमान असायला हवा. जर रामदेव यांना त्यांची ओळख उघड करण्यात काही अडचण नाही, तर रहमान यांना त्यांची ओळख उघड करण्यात अडचण का आहे? प्रत्येकाला त्यांच्या नावाचा अभिमान असायला हवा. नाव लपवण्याची गरज नाही, फक्त कामात शुद्धता हवी. जर आपले काम शुद्ध असेल तर आपण हिंदू, मुस्लीम किंवा इतर कोणत्याही समुदायाचे असलो तरी काही फरक पडत नाही, अशा शब्दांत त्यांनी या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे.