कर्नाटकमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती झाली जप्त? जनमानसात आक्रोश, राजकारण तापलं!

ऐन गणेशोत्सवात राजकीय क्षेत्रात चर्चा रंगली ती कर्नाटक मधील एका घटनेची. कर्नाटकमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनी गणपती बाप्पाची मूर्ती जप्त केल्याचं सांगितलं गेलं. या सर्व प्रकारवर राजकीय क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात टीका झाली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 18 Sep 2024
  • 01:47 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

ऐन गणेशोत्सवात राजकीय क्षेत्रात चर्चा रंगली ती कर्नाटक मधील एका घटनेची. कर्नाटकमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत  पोलिसांनी गणपती बाप्पाची मूर्ती जप्त केल्याचं सांगितलं गेलं. या सर्व प्रकारवर राजकीय क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात टीका झाली. या प्रकारची घटना यापूर्वी कधीही घडली नव्हती. मात्र अशी बातमी आल्याने कर्नाटकच नव्हे तर महाराष्ट्रात देखील या घटनेबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा होवून झाल्या प्रकारावर मोठी टीका केली गेली.  

गणपती हे हिंदूंचं आराध्य दैवत. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात  श्री गणेशाच्या प्रार्थनेने करण्याची  पद्धत आपल्याकडे आहे. भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे मराठी आहेत. त्यांनी आपल्या घरी गणपतीची स्थापना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन गणपतीची आरती केली. मात्र त्यानंतर काँग्रेस आणि महाविकास आघाडीने  त्यावर मोठ्या प्रमाणावर टीका केली. काँग्रेस,  शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी याबाबत वेगवेगळी वक्तव्य केली. इतकंच नव्हे तर सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड  यांच्या विश्वासार्हतेवर देखील यानंतर चर्चा सुरू झाल्या.

दरम्यान कर्नाटकामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती  पोलिसांकडून जप्त केली गेल्याच्या बातमीमुळे सर्व स्तरातून कडक निंदा होत आहे.  काँग्रेसशासित कर्नाटक राज्यात ही घटना घडल्यामुळे या चर्चेला अजूनच उधाण आले. यापूर्वी  देवाची मूर्ती जप्त करण्याची घटना भारतात कुठेही घडलेली नाही. खरंतर ज्या कालावधीत ही घटना घडल्याचं बोललं गेलं त्यामुळे देखील अनेक प्रश्न निर्माण केले गेले. जेव्हा गणपतीचं विसर्जन होणार होतं अशाच वेळी ही घटना घडल्याची चर्चा होणं चिंता वाढवणार ठरलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गणपतीची आरती करून  दर्शन घेतलं. त्यानंतर यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. मात्र त्यानंतर भाजपाने काँग्रेसवर थेट पलटवार केला.  मनमोहन सिंग पंतप्रधान असताना  त्यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीची आठवण भाजपने करून दिली. या पार्टीला तत्कालीन सरन्यायाधीश  के.जी. बालकृष्णन  हे देखील उपस्थित होते. काँग्रेसला त्या इफ्तार पार्टी बद्दल सोयीस्कर विसर पडला असल्याची टीका भाजपने  केली. शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटलं की, काँग्रेस  पक्षाने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला  अनुमती आहे  परंतु गणपतीच्या आरतीला नाही का? असं म्हणून त्यांनी काँग्रेसवर पलटवार केला.

नुकतंच संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यक्रमात  एनसीपी (शरद पवार) चे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे खासदार शाहू महाराज  सहभागी झाले होते. या कार्यक्रमात प्रभू श्री राम  आणि श्री स्वामी समर्थ यांच्या बद्दल अनुद्गार काढले गेले. शरद पवारांच्या उपस्थितीत  हे सर्व घडलं. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात  टीका झाली. इतकंच नव्हे तरी हे सर्व बोलले जात असताना शरद पवार आणि शाहू महाराज हे टाळ्या वाजवत असल्याचं देखील बोललं गेलं.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest