संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली: गेल्या वर्षी संसदेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी पैसे घेतल्याच्या (कॅश फॉर क्वेरी) आरोपात अडकलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी नाहक एक वाद ओढावून घेतला आहे. त्यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेच्या सायबर युनिटने हा गुन्हा नोंदवला आहे. त्यांच्या विरोधात बीएनएसचे कलम ७९ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
महुआ यांनी समाज माध्यमावर एका पत्रकाराने पोस्ट केलेल्या व्हीडीओवर कमेंट करताना राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांवर खालच्या पातळीची टीका केली होती. त्यानंतर हा वाद भडकला. आयोगासह भाजपने महुआविरोधात रान पेटवले. महिला आयोगाने तातडीने शुक्रवारी (५ जुलै) त्यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान सत्संगात चेंगराचेंगरी झाल्यानंतर महिला आयोग उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये दाखल झाला होता. आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा ३ जुलै रोजी घटनास्थळी गेल्या होत्या. या विषयीचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर दिसला. त्यात एक व्यक्ती शर्मा यांच्या डोक्यावर छत्री धरून उभा होता. त्या व्हीडीओवर पत्रकार निधी राजदान यांनी टीका केली. शर्मा यांना छत्रीसुद्धा हातात धरता येत नाही का? असा सवाल त्यांनी विचारला होता. तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी पत्रकाराच्या कमेंटवर अश्लाघ्य प्रतिक्रिया दिली. ‘ती आपल्या बॉसचा पायजमा पकडण्यात गुंतलेली आहे’, अशी अश्लाघ्य टिप्पणी मोईत्रा यांनी केली. त्यानंतर वाद उफळला. ही टिप्पणी अत्यंत अपमानजनक असल्याचे सांगत राष्ट्रीय महिला आयोगाने दिल्ली पोलिसांत तक्रार दिली.
मोईत्रांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. खासदार मोईत्रा यांच्या अजून एका ट्विटने वादाला हवा मिळाली. ‘मला अटक करायची असेल तर मी नादियात’, असल्याचे आव्हानच त्यांनी दिल्ली पोलिसांना दिले. महिला आयोगाच्या आदेशावर लागलीच कारवाई करा. पुढील तीन दिवस आपली गरज असेल आणि अटक करायचे असेल तर नादियात या, अशी प्रतिक्रिया महुआ यांनी दिली होती.