ED : ऐन निवडणुकीत ईडी सक्रिय!, कॉंग्रेसच्या 'या' बड्या नेत्याच्या निवासस्थानावर छापे

राजस्थानमधील पेपर फुटीप्रकरणी (Paper Burst Case) महसूल संचालनालयाच्या (ईडी)(ED)पथकाने गुरुवारी सकाळी प्रदेश काँग्रेसचे (Congress)अध्यक्ष गोविंद सिंह डोटसरा (Govind Singh Dotsara) यांच्या घरावर छापा टाकला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Fri, 27 Oct 2023
  • 12:54 pm
Govind Singh Dotsara

ऐन निवडणुकीत ईडी सक्रिय!

राजस्थानात पेपर फुटीप्रकरणी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंह डोटसरांच्या निवासस्थानावर छापे; काँग्रेसकडून निषेध

राजस्थानमधील पेपर फुटीप्रकरणी (Paper Burst Case) महसूल संचालनालयाच्या (ईडी)(ED)पथकाने गुरुवारी सकाळी प्रदेश काँग्रेसचे (Congress)अध्यक्ष गोविंद सिंह डोटसरा (Govind Singh Dotsara) यांच्या घरावर छापा टाकला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील पेपरफुटीच्या संदर्भात हा छापा टाकण्यात आला असून ईडी सध्या डोटसरा आणि त्यांच्या नातेवाइकांची चौकशी करत आहे. ईडीचे पथक जयपूरमधील डोटसरांचे अधिकृत निवासस्थान आणि सीकरमधील त्यांच्या खासगी निवासस्थानीही पोहोचले आहे.

राजस्थान विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून त्याचा प्रचार आता वेगावत आहे. अशा नेमक्या वेळी केंद्राच्या महसूल संचालनालयाने (ईडी ) सक्रिय होऊन कारवाया करणे म्हणजे एक राजकीय वळण असल्याची टीका सत्तारूढ काँग्रेसने केली आहे.  महसूल संचालनालयाच्या (ईडी) कारवाया या बहुतेक वेळा विरोधी पक्षाच्या नेत्यांवर प्रामुख्याने होत असून त्याद्वारे संशयाचे वातावरण तयार केले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. या आरोपाला पुष्टी देणाऱ्या घटना अनेक राज्यात झाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे छापा टाकल्यानंतर आरोपपत्र सादर करणे आणि ते सिद्ध होणे याचे प्रमाण फारच कमी आहे. यामुळे  महसूल संचालनालयाचा (ईडी ) वापर विरोधी नेत्यांना बदनाम करण्यासाठी होत असल्याचा आरोप सर्व विरोधी पक्ष करत आहेत.

ईडीचे पथक डोटसरा यांच्या नातेवाइकांच्या घरीही पोहोचले असून पेपर फुटीप्रकरणी प्रथमच ईडीने डोटसरांच्या घरावर छापा टाकला आहे. दिल्ली आणि जयपूर येथील ईडी पथकांसोबत केंद्रीय सुरक्षा दलाचे अधिकारीही उपस्थित आहेत. सीकर जिल्ह्यातील लक्ष्मणगढ विधानसभा मतदारसंघातून डोटसरा हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. महुव्यातील अपक्ष आमदार आणि काँग्रेसचे उमेदवार ओमप्रकाश हुडला यांच्या घरावरही ईडीने छापे टाकले आहेत. हुडला यांच्या दौसा, जयपूरसह अनेक ठिकाणी असलेल्या मालमत्तेच्या जागी ईडीचे पथक पोहोचले आहे. दौसा जिल्ह्यातील हुडला पेट्रोल पंपावरही ईडीने छापे टाकले आहेत. ईडीचे कर्मचारी हुडलांची कार्यालये आणि व्यावसायिक आस्थापनांमधील कागदपत्रे स्कॅन करत आहेत.

पेपर फुटीप्रकरणी ईडीने यापूर्वी डोटसरांच्या जवळच्या लोकांवर छापे टाकले होते. सीकरमधील कलाम कोचिंग सेंटर आणि इतर अनेक ठिकाणी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ईडीने छापे टाकले होते. त्यावेळी डोटसरांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना विनाकारण त्रास देत असल्याचा आरोप केला होता.

पेपर फुटीप्रकरणात ईडीने राजस्थान लोकसेवा आयोगाचे सदस्य बाबूलाल कटारा यांच्यासह अनेकांवर कारवाई केली आहे. पेपरफुटीशी संबंधित आरोपींना पोलिसांनी आधी अटक केली होती.  त्यानंतर ईडीने हे प्रकरण आपल्या हाती घेत कारवाई केली.

भाजपचे राज्यसभा खासदार किरोडीलाल मीणा यांनी पेपर फुटीप्रकरणात मंत्री आणि आमदारांचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह डोटसरा यांच्यावरही भाजप नेत्यांनी आरोप केले होते. डोटसरा हे नोव्हेंबर २०२१ पर्यंत शिक्षणमंत्री होते. त्यामुळे या प्रकरणी विरोधी भाजप नेत्यांनी त्यांच्यावर आरोप केले आहेत.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest