नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे त्यांच्या कठोर निर्णयामुळे कायम चर्चेत असतात. देशभरातील वेगवेगळ्या प्रकरणांवरील सुनावणीवेळी त्यांनी केलेल्या टिप्पणीही चर्चेत असतात. आता एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी एक महत्त्वाची टिप्पणी करत वकिलांना फटकारले आहे. सर्वोच्च न्यायालयात विविध खटल्यांवरील सुनावणीदरम्यान वकील अनेकदा पाठीमागच्या काही खटल्यांचा संदर्भ देत असतात. मात्र, यावरूनच सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी एका प्रकरणावरील सुनावणीवेळी नाराजी व्यक्त केली आहे.
सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी (१ ऑक्टोबर ) एका प्रकरणाची सुनावणी सुरू होती. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या खंडपीठाने न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला आणि मनोज मिश्रा यांच्यासमवेत न्यायालयीन सुनावणी सुरू केली. त्यावेळी एका वकिलाने खाण उत्खननाशी संबंधित प्रकरणाचा उल्लेख केला.
मात्र, या सुनावणीवेळी वकिलांनी अनेक वेळा या प्रकरणाचा उल्लेख करत संदर्भ दिला, त्यामुळे सरन्यायाधीश संतापले. सरन्यायाधीश या नात्याने माझ्याकडे जी काही विवेकबुद्धी आहे, ती तुमच्या पक्षात कधीही वापरली जाणार नाही. तुम्ही न्यायालयाची दिशाभूल करू शकत नाही. माझी वैयक्तिक विश्वासार्हता पणाला लागली आहे. मला प्रत्येकासाठी मानक नियमांचे पालन करावे लागेल. वारंवार एकच संदर्भ देण्याची ही प्रथा थांबवा.
तुम्ही सगळे फक्त संधी घेण्याचा प्रयत्न करत आहात. पण मी ते करणार नाही. कारण माझी वैयक्तिक विश्वासार्हता धोक्यात आली आहे. मला प्रत्येकालाच न्याय द्यायचा आहे, अशा शब्दांत चंद्रचूड यांनी खरडपट्टी काढली. दरम्यान, खाण उत्खननाशी संबंधित एक प्रकरण सोमवारीही खंडपीठासमोर सुनावणीसाठी आले होते.