तिरुमला : प्रसादाच्या लाडूतील भेसळ रोखण्यात अपयश, उपमुख्यमंत्री पवन कल्याण ११ दिवसांचा उपवास करून घेणार प्रायश्चित्त

आंध्र प्रदेशमधील तिरुपतीस्थित श्री वेंकटेश्वर मंदिरामध्ये प्रसाद म्हणून वाटप केल्या जाणाऱ्या लाडवाच्या नमुन्यामध्ये निम्न दर्जाचे तूप आणि प्राण्यांची चरबी आढळल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

पवन कल्याण

आंध्र प्रदेशमधील तिरुपतीस्थित श्री वेंकटेश्वर मंदिरामध्ये प्रसाद म्हणून वाटप केल्या जाणाऱ्या लाडवाच्या नमुन्यामध्ये निम्न दर्जाचे तूप आणि प्राण्यांची चरबी आढळल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. ही भेसळ रोखू शकलो  नसल्याची खंत व्यक्त करत उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांनी प्रायश्चित्त करण्याचा निर्णय घेतला आहे. पवन कल्याण ११ दिवसांचा उपवास करणार आहेत.

प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी मिसळल्याचे प्रकरण दिवसेंदिवस रंगू लागले आहे. या प्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत. त्यामुळे आता आंध्र प्रदेशचे राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पवन कल्याण आता गुंटूर जिल्ह्यातील नंबूर येथील श्री दशावतार वेंकटेश्वर स्वामी मंदिरात २२ सप्टेंबरपासून ११ दिवसांची प्रायश्चित्त दीक्षा घेणार आहेत. तिरुपती मंदिरातील लाडूमध्ये जनावरांची चरबी आढळल्यामुळे मला अतीव दुःख झाले.

मागच्या सरकारच्या काळात ही घटना घडली असली, तरी मला माझीच फसवणूक झाल्याचे वाटते, त्यामुळे मी प्रायश्चित्त करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले. मी प्रसादाच्या लाडूमधील भेसळ रोखू शकलो नाही, त्यामुळे मला आतून फसवणूक झाल्यासारखे वाटत आहे. यासाठी मी ११ दिवसांचा उपवास करून प्रायश्चित्त करत आहे, अशी पोस्ट पवन कल्याण यांनी एक्सवर टाकली आहे.

आपली संस्कृती, आस्था, विश्वास आणि श्रद्धा यांचा सन्मान करणारी आहे. श्री तिरुपती बालाजी देवस्थानाच्या प्रसादात भेसळ करून जे पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला, त्याबद्दल मला मनापासून दुःख वाटत आहे. खरे सांगयाचे तर मला माझीच फसवणूक झाली असे वाटत आहे. प्रभू वेंकटेश्वरकडे मी प्रार्थना करतो की, त्याची कृपादृष्टी आमच्यावर आणि सर्व सनातन्यांवर कायम राहू दे.

मी या क्षणापासून आता देवासमोर प्रायश्चित्त करून माफी मागत आहे. यासाठी मी ११ दिवसांचा उपवास करण्याचा धर्मसंकल्प सोडत आहे. उपवासाच्या शेवटच्या दिवशी १ किंवा २ ऑक्टोबर रोजी मी स्वतः तिरुपती बालाजीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेत आणि देवाची माफी मागणार आहे. दरम्यान पवन कल्याण यांनी संपूर्ण भारतातील मंदिरांशी संबंधित सर्व समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ‘सनातन धर्म संरक्षण मंडळ’ स्थापन करण्याची मागणीही केली आहे. सनातन धर्माचा कोणत्याही स्वरूपात होणारा अपमान थांबवण्यासाठी आपण सर्वांनी त्वरित एकत्र आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest