File Photo
भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग यशस्वीरित्या कर्करोगावर मात केली. त्यानंतर त्यांनी कर्करोगाबद्दल जाणिवजागृती आणि मदत करण्यासाठी एक स्वयंसेवी संस्था स्थापन केली होती. या एनजीओने स्तनांच्या कर्करोगाबाबत महिलांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी दिल्ली मेट्रोमध्ये एक जाहिरात केली होती. या जाहिरातीच्या मजकूरा बाबत मात्र आता चहुबाजूंनी टीका होत आहे.
या जाहिरातीमध्ये महिलांच्या स्तनांसाठी संत्री हा शब्द वापरला आहे. या जाहिरातीचा फोटो कोण्या एका वापरकर्त्याने जेव्हा सोशल मिडिवर टाकला तेव्हा त्यावर चौफेर टिका होत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी या जाहिरातीबाबत आक्षेप घेतल्यानंतर दिल्ली मेट्रो प्रशासनाने ही जाहिरात हटविण्याचा निर्णय घेतला आहे.
अनेक लोकांनी ही जाहिरात लाजिरवाणी आणि भयंकर असल्याचे म्हटले आहे. वाद उद्भवल्यानंतर दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दि. २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ही वादग्रस्त जाहिरात हटविली. ही जाहिरात फक्त एकाच ट्रेनमध्ये लावली होती, अशीही स्पष्टोक्ती रेल्वेतर्फे देण्यात आली.
डॉ. जेसन फिलिप यांनीही या जाहिरातीवर आक्षेप घेतला. एक्सवर केलेल्या पोस्टमध्येते म्हणाले, मला ही जाहिरात खटकली. माझी आई स्तनाच्या कर्करोगामुळे दगावली. चौथ्या टप्प्यावर कर्करोग असल्याचे निदान झाले होते. खेदाची बाब म्हणजे तिचा मुलगा ब्रेस्ट सर्जन आहे. तरीही तिला तिच्या दुखण्याबाबत मुलाला सांगता आले नाही. जर आजाराबाबत थोडे लवकर कळले असते तर त्यावर इलाज करता आला असता. त्यामुळे कृपया करून स्तनांच्या कर्करोगाला लैंगिकतेशी जोडू नका. हा आता जगभरात पसरलेला कर्करोग आहे.
युवराज सिंगच्या युवीकॅन या एनजीओची स्थापना २०१२ साली करण्यात आली होती. कर्करोगाच्या विरोधात लढणाऱ्या लोकांना जागृती, लवकर निदान करणे, रुग्णांना सहकार्य आणि रुग्णाच्या पश्चात उरलेल्या कुटुंबियांना बळ देणे अशा प्रकारचे उपक्रम या एनजीओकडून घेतले जातात.
ते संत्री नाहीत तर स्तन आहेत. कृपया हे स्पष्टपणे म्हणा. तुमची आई, पत्नी, बहीण आणि मुलीलाही ते आहेत. ती संत्री नाहीत.
- महुआ मोईत्रा, खासदार, तृणमूल काँग्रेस