संग्रहित छायाचित्र
तिरुवनंतपूरम: देशभरातील महिला अत्याचाराच्या घटनांसोबतच आता मल्याळम चित्रपटसृष्टीतील महिला अत्याचाराची प्रकरणे बाहेर येत आहेत. या जोडीला केरळ काँग्रेसमध्येही महिलांवर अत्याचार होत असल्याचा आरोप केरळ काँग्रेसच्या नेत्या सिमी रोजबेल जॉन यांनी केला आहे. राज्य काँग्रेसमध्ये कास्टिंग काऊच होत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे. अर्थात पक्षाने त्यांचे सदस्यत्व काढून घेतले आहे.
चित्रपटांसारखी कास्टिंग काऊचची परिस्थिती केरळ काँग्रेसमध्ये निर्माण झाली आहे. ज्येष्ठ नेत्यांच्या जवळच्या व्यक्तींनाच पक्षात पुढे जाण्याची संधी मिळते.
महिलांचे सर्वच क्षेत्रात, अगदी कामाच्या ठिकाणी आणि राजकारणातही शोषण होत आहे. पक्षातील अनेक सहकारी महिलांनी त्यांचे वाईट अनुभव माझ्यासोबत शेअर केले आहेत. मी केरळच्या महिला नेत्यांना सल्ला देते की, नेत्यांना भेटायला एकट्या जाऊ नका. तुमच्या कुटुंबीयांना किंवा मित्रांना सोबत घेऊन जा. माझ्याकडे पुरावे आहेत जे योग्य वेळी समोर येतील. केरळ काँग्रेसमध्ये संधी मिळण्यासाठी महिला नेत्या आणि कार्यकर्त्यांनी शोषणाला सामोरे जाण्यास तयार राहावे, असे आवाहन सिमी रोजबेल जॉन यांनी केले आहे.
सिमी यांच्या या आरोपांनंतर, रविवारी (१ सप्टेंबर) केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे (केपीसीसी) सरचिटणीस एम. लिजू यांनी सिमी रोजबेल जॉन यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. त्यांचे प्राथमिक सदस्यत्व काढून घेण्यात आले आहे. सिमी रोजबेल जॉन यांनी पक्षाची शिस्त मोडली असल्याचा आरोप केपीसीसीने केला आहे. काँग्रेसच्या आरोपांवर सिमी यांनी कोचीमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्या म्हणाल्या की, अलीकडे पक्षासाठी दीर्घकाळ काम करणाऱ्या व्यक्तींना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला जात आहे. त्यासाठी काहीही कारणे दिली जात आहेत. पक्षातील चुकीच्या गोष्टींची जाहीर वाच्यता करू नये, यासाठी अशा कारवाया केल्या जात आहेत. महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा लतिका सुभाष, के. करुणाकरन यांची मुलगी पद्मजा वेणुगोपाल यांनाही बाहेर काढण्यात आले. स्वाभिमान असलेल्या महिला आता काँग्रेसमध्ये काम करू शकणार नाहीत. महिलांचे लैंगिक शोषण थांबावे असा आग्रह मी धरला म्हणून मलाही काढून टाकण्यात आले. महिलांचा आवाज बनून मी चूक केली. माझ्यासह अनेक लोक आता वेगवेगळ्या पदांवर आहेत. आता रस्त्यावर चालायला भीती वाटते. मला काहीही होऊ शकते. दरम्यान केरळ काँग्रेसचे प्रमुख के. सुधाकरन म्हणाले, महिला काँग्रेसने सिमी रोजबेल जॉनच्या आरोपांची चौकशी केली आहे. सिमीने नेत्यांवर चुकीची टिप्पणी केली आहे. त्यांचे आरोप निराधार आहेत.