संग्रहित छायाचित्र
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज (23 जुलै) सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प आहे. तर अर्थमंत्री सीतारामण यांनी सलग सातवा अर्थसंकल्प सादर केलाय.
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून (२२ जुलै) सुरु झाले. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण सादर केले.
या अर्थसंकल्पात स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा ५० हजारांवरून ७५ हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे. पेन्शनची मर्यादाही १५ हजारांवरून २५ हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे. याचा फायदा ४ कोटी पगारदार आणि पेन्शनधारकांना होईल असे निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले. देशभरातील दोन तृतीयांश करदात्यांनी नवीन करप्रणालीचा स्वीकार केला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी एंजेल टॅक्स रद्द करण्याची घोषणा सीतारामण यांनी केली.
नव्या कर प्रणालीत तीन लाखापर्यंतच्या उत्पनावर कर लागणार नाही.
कररचनेत असा होणार बदल:
० ते ३ लाख उत्पन्न – ० टक्के कर
३ ते ७ लाख उत्पन्न – ५ टक्के कर
७ ते १० लाख उत्पन्न – १० टक्के कर
१० ते १२ लाख उत्पन्न – १५ टक्के कर
१२ ते १५ लाख उत्पन्न – २० टक्के कर
१५ लाखांवर उत्पन्न – ३० टक्के कर
या बदलांमुळे नव्या करप्रणालीचा स्वीकार करणाऱ्या करदात्यांचा १७५०० रुपयांचा फायदा होईल असे निर्मला सीतारमण यांनी सांगितले.