Al-Qaeda Terrorist Module : अल-कायदाच्या दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड; राजस्थान, यूपी, झारखंडमध्ये दिल्ली पोलिसांनी केली कारवाई
#नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी अल-कायदाच्या दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड केला. राजस्थान, झारखंड, उत्तर प्रदेशातून १५ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दिल्ली पोलिसांनी झारखंडमधून ८, राजस्थानातून ६ जणांना तर एकास उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतले. रांचीच्या डॉ. इश्तियाक अहमद नावाच्या व्यक्तीवर दहशतवादी मॉड्यूलचा म्होरक्या असल्याचा आरोप आहे. तो रांची येथील मेडिका रुग्णालयात रेडिओलॉजिस्ट म्हणून काम करतो. इश्तियाकचे देशात दहशतवादी हल्ल्यांचे मनसुबे होते. झारखंडमध्ये दहशतवाद प्रतिबंधक पथकाने (एटीएस), एसटीएफ व दिल्ली पोलिसांनी १६ ठिकाणी छापे टाकले.
रांची, हजारीबाग, लोहरदगा येथे पकडलेल्या आठ संशयितांच्या ठिकाणांवर शस्त्रास्रे, लॅपटॉप, मोबाइल, संशयास्पद कागदपत्रे आढळून आले. चौपानकी (भिवाडी) डोंगरात अल-कायदाच्या प्रशिक्षण केंद्र असल्याचे उजेडात आले. विशेष पथकाने तेथे प्रशिक्षण घेणाऱ्या सहा संशयितांकडून मोठ्या प्रमाणात दारुगोळा, शस्त्रास्रे जप्त केली. ते सगळे एकाच घरात राहत होते. झारखंडचे पोलिस महासंचालक अमोल रेणुकांत होमकर म्हणाले, अल-कायदाशी संबंधित तरूण कट्टरवादी तयार करत अाहेत. त्यांचा वापर भारताच्या विरोधात युद्ध छेडण्यासाठी ही भरती करणे हा त्यामागील उद्देश आहे.
एटीएसने रांचीच्या जोडा तलाव येथील अपार्टमेंटमधून डॉ. इश्तियाक अहमदला पकडले. दिल्ली पोलिसांच्या प्रवक्त्या सुमन नलवा म्हणाल्या, ‘‘गुप्त अभियानांतर्गत रांचीमधून चालवल्या जाणाऱ्या अल-कायदाच्या या दहशतवादी मॉड्यूलचा म्होरक्या डॉ. इश्तियाक अहमद रांची येथील मेडिका रुग्णालयात रेडिअोलॉजिस्ट या पदावर नोकरीला आहे. तो मूळचा जमशेदपूरचा आहे. हजारीबागमधून अटक फैजान एक वर्षापासून डॉ. इश्तियाकच्या संपर्कात होता. इश्तियाक आपल्या सहकाऱ्यांसह फैजानच्या घरी भोजनासाठीही येऊन गेला आहे. मॉड्यूलच्या सदस्यांना वेगवेगळ्या ठिकाणी तयार करण्यात आले आणि त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले गेल्याची माहिती स्पेशल सेलने केलेल्या या कारवाईतून समोर आली आहे.’’