संग्रहित छायाचित्र
बिहार पोलीसमध्ये सुपरकॉप अशी ओळख असलेले आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी भारतीय पोलिस सेवेतील नोकरीचा राजीनामा दिला आहे. शिवदीप लांडे हे आमदार विजय शिवतारे यांचे जावई आहेत. त्यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्याची बिहार, महाराष्ट्रासोबतच संपूर्ण देशात चर्चा सुरू झाली आहे. बिहारचे सिंघम अशी त्यांची ओळख आहे.
सोशल मिडियावर पोस्ट करत त्यांनी याबद्दल माहिती दिली. 2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले शिवदीप लांडे यांनी बिहारमधील अरारिया, पूर्णिया आणि जमलपूरमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून काम प्रभावी काम केले होते. सध्या ते बिहारच्या स्पेशल टास्क फोर्समध्ये अधीक्षक म्हणून कार्यरत होते.
शिवदीप लांडे यांची सोशल मीडिया पोस्ट -
प्रिय बिहार, गेली 18 वर्षे सरकारी पदाच्या माध्यमातून सेवा केल्यानंतर मी आता माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. माझ्या या सगळ्या कार्यकाळात मी बिहार राज्याला स्वत:पेक्षा आणि कुटुंबापेक्षा सर्वोच्च मानले आहे. माझ्या सेवेच्या काळात माझ्याकडून कोणतीची चुकभूल झाली असेल तर मी त्यासाठी क्षमस्व आहे. मी भारतीय पोलीस सेवेतून राजीनामा दिला आहे. मात्र, यापुढेही बिहार हीच माझी कर्मभूमी असेल. मी बिहारमध्येच राहणार आहे, असे शिवदीप लांडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले आहे.
पोलीस महासंचालक कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना लांडे यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी म्हटले की, राजीनाम्याची बातमी खरी आहे. मी वैयक्तिक कारणांमुळे भारतीय पोलीस सेवेचा राजीनामा दिला आहे. शिवदीप लांडे महाराष्ट्रातील विदर्भातील अकोल्याचे रहिवासी आहेत. त्यांना आयपीएस म्हणून बिहार केडर मिळाले होते. त्यांनी इलेक्ट्रीकल इंजिनिअरची पदवी शिक्षण घेतलं आहे.
शिवदीप लांडे यांनी काही काळ महाराष्ट्र पोलीस दलात देखील काम केले आहे. आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे हे शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत. महाराष्ट्रात मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थांच्या विरोधी पथकात कार्यरत असताना प्रभावी कामगिरी करून अधिकारी शिवदीप लांडे यांनी ड्रग्ज तस्करांचे कंबरडे मोडले होते. तसेच गुन्हे शाखेचे उपायुक्त असताना त्यांनी अनेक महत्वाचे गुन्हे उघडकीस आणले होते.