संग्रहित छायाचित्र
वाराणसीच्या आयआयटी-बीएचयूमध्ये बीटेकच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींची सात महिन्यांनंतर सुटका करण्यात आली. अलाहाबाद उच्च न्यायालयाने आरोपी कुणाल पांडे आणि आनंद उर्फ अभिषेक चौहान यांना सशर्त जामीन मंजूर केला.
तिसरा आरोपी सक्षम पटेल याचा जामीन न्यायालयाने स्वीकारला नाही. त्याच्या जामीन अर्जावर १६ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. कुणालला २४ऑगस्टला तर आनंदला २९ऑगस्टला सोडण्यात आलं होतं. शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आनंद २९ ऑगस्ट रोजी नागवा कॉलनीतील त्याच्या घरी पोहोचला तेव्हा त्याचे स्वागत करण्यात आले. कुणाल आणि आनंदची घरे शेजारी शेजारी आहेत. गँगरेपचे तिन्ही आरोपी भाजप आयटी सेलशी संबंधित होते. ते सरकारमधील मंत्री, आमदारांसह बड्या नेत्यांच्या संपर्कात होते.
या हायप्रोफाईल प्रकरणात वाराणसी पोलिसांनी १७ जानेवारी रोजी सामूहिक बलात्काराचे आरोपपत्र दाखल केले होते. पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध गँगस्टर कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. गुंडावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा जामीन अर्ज सातत्याने फेटाळला जात होता. आनंद, कुणाल आणि सक्षम या तिन्ही आरोपींना घटनेच्या ६० दिवसांनंतर ३० डिसेंबर २०२३ रोजी अटक करण्यात आली होती. हे तिन्ही आरोपी ३१ डिसेंबरपासून जिल्हा कारागृहात होते. त्यांना गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींच्या बराकीत ठेवण्यात आले होते.
पोलिसांच्या आरोपपत्रात तीन आरोपींचे रूट चार्ट, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनचा आधार घेण्यात आला. यासोबतच पीडित विद्यार्थिनी, तिचा मित्र आणि एका गार्डच्या जबाबांनाही आरोपींविरुद्ध आधार बनवण्यात आले आहे. व्हॉट्सॲप चॅटही कोर्टात सादर करण्यात आले आणि जप्त केलेल्या बुलेटचाही उल्लेख करण्यात आला. तिघेही व्यावसायिक गुन्हेगार असून त्यांना लोकांमध्ये जाऊ देऊ नये, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले होते.
आरोपी आनंदने ११ नोव्हेंबर २०२३ रोजी जामीन अर्ज दाखल केला होता, त्यावर अनेक वेळा सुनावणी झाली आणि तारीख वाढत गेली. आनंदने त्याच्या कुटुंबाच्या आजारपणासह अनेक कारणे सांगितल्यावर न्यायालयाने २ जुलै रोजी जामीन स्वीकारला, पण अनेक अटी घातल्या. प्रत्येकी एक लाख रुपयांच्या दोन जामीनांच्या पडताळणीसाठी अनेक दिवस लागले.
पीडितेवर दबाव टाकणे सुरूच
फिर्यादीच्या वकिलांनी सांगितले की, न्यायालयाने आयआयटी-बीएचयू सामूहिक बलात्कार प्रकरणाची सुनावणी जलद केली आहे. या प्रकरणात, बलात्कार पीडित विद्यार्थिनीला न्यायालयाने २२ ऑगस्ट रोजी प्रथम समन्स बजावले होते, त्यानंतर पीडितेला पोलिस संरक्षणात न्यायालयात हजर करण्यात आले होते.
पीडितेने बीएचयूची घटना न्यायालयासमोर मांडली. तिने सांगितले की, तिन्ही आरोपींनी अत्याचार केले, धमकावले आणि नंतर तेथून पळ काढला. पीडितेने सांगितले की, या घटनेनंतर तिच्यावर अनेक प्रकारे दबाव येत आहे. मला बाहेर जाण्याची भीती वाटते, त्यामुळे मी बहुतेक वेळा हॉस्टेलमध्येच राहते.