संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली: यंदाचा ऑगस्ट महिना सर्वाधिक हॉट ठरला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्टमध्ये देशभरात सरासरी किमान तापमान २४.२९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. हे सरासरी तापमानापेक्षा ०.६१ अंश सेल्सिअस जास्त होते.
१९०१ नंतर यंदा प्रथमच ऑगस्टमधील सर्वाधिक तापमान नोंदवले गेले आहे. याखेरीज यंदाच्या ऑगस्ट माहिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला असल्याचीही नोंद करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट महिन्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस झाला. मात्र, असे असूनही ऑगस्ट महिन्यात देशभरात सरासरी तापमान २४.२९ अंश सेल्सिअस इतके होते. १९०१ नंतर सर्वात जास्त उष्णता असलेला यावेळचा ऑगस्ट महिना नोंदवला गेला असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. आयएमडीच्या माहितीनुसार, ऑगस्टमध्ये देशभरात सरासरी किमान तापमान २४.२९ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. ऑगस्टमध्ये मध्य भारत आणि दक्षिण भारतात रात्रीचं तापमान खूप जास्त उष्ण राहिले आहे. मध्य भारतात कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा ०.५५ अंश सेल्सिअस जास्त (२४.२६ अंश सेल्सिअस) होतं. तसेच दक्षिण द्वीपकल्पीय भारतात सामान्य तापमानापेक्षा ०.७२ अंश सेल्सिअस (२४.१२ अंश) जास्त होते.
ऑगस्ट महिन्यात दक्षिण भारतात २०२.४ मिमी (६.६ टक्के) पाऊस पडला. दरम्यान, या ठिकाणी नोंदवले गेलेले सरासरी किमान तापमान २४.१२ अंश सेल्सिअस होते. इतर वेळी सामान्य २३.४१ अंश सेल्सिअस होते. मध्य भारतात ३५९.६ मिमी (१६.५टक्के) पाऊस पडला. या ठिकाणी सरासरी किमान तापमान २४.२६ अंश सेल्सिअस (२३.७१ अंश सेल्सिअस) नोंदवले गेले. दरम्यान, या वर्षीचा ऑगस्ट महिना हा पूर्व आणि ईशान्य भारत आणि वायव्य भारतातील सर्वात उष्ण होता, असेही आयएमडीने नमूद केले आहे. ऑगस्टमध्ये अनेक ठिकाणी चांगल्या पावसाची नोंद झाली. मात्र, सततच्या ढगाळ वातावरणामुळे किमान तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त होतं. देशातील बहुतेक भागात विशेषतः मध्य भारतात सरासरी किमान तापमानापेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. तसेच गेल्या सहा वर्षांतील भारतातील ऑगस्टच्या पावसाची तुलना केल्यास असे दिसून आले की, २०१९ नंतर २०२४ मध्ये मासिक पर्जन्यमानाची कामगिरी सर्वाधिक होती. तसेच २०२१ आणि २०२३ मध्ये पावसाची लक्षणीय तूट नोंदवली गेली.