संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली/ कोलकाता : कोलकात्यामधील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. या डॉक्टर तरुणीच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी देशभरातील डॉक्टरांच्या संघटना व सामान्य नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. पीडितेसाठी प्रामुख्याने तरुणी व महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. दरम्यान, एका बाजूला या घटनेमुळे देशभरातून संतापाची लाट उसळलेली असतानाच काही लोकांनी विकृतीचा कळस केला आहे. काही लोक समाजमाध्यमांवर, इंटरनेटवर बलात्काराचा व्हीडीओ शोधत आहेत, तर काही लोक याचा गैरफायदा घेऊन पैसे कमावण्याचा प्रयत्न करत आहेत.
इंटरनेटवर अनेक लिंक्स व मल्टीमीडिया फाईल्स पीडितेचा पॉर्न व्हीडीओ म्हणून शेअर करण्यात आला आहे. टेलिग्रामवरही अशा मल्टीमीडिया फाईल्स पाहायला मिळत आहेत. अनेक टेक कंपन्या देखील यात सहभागी आहेत. ५० हून अधिक संकेतस्थळे व ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स स्कॅन केल्यानंतर असे आढळून आले आहे की, जास्तीत जास्त वेब ट्रॅफिक मिळवण्यासाठी पीडितेचा व्हीडीओ म्हणून (अशा नावाने) अनेक लिंक्स व मल्टीमीडिया फाईल्स शेअर केल्या जात आहेत. फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, टेलिग्रामसारखा एन्क्रिप्टेड मेसेजिंग प्लॅटफॉर्म, पॉर्न वेबसाईट्स व इतर वेबसाईट्ससह डोमेन्सवर या गोष्टी सर्रास शेअर केल्या जात आहेत.
कोलकात्यामधील घटनेनंतर अनेक सोशल मीडिया साईट्स, पॉर्न साईट्स व इंटरनेटवर सेक्स, पॉर्न, रेप पॉर्न, कोलकाता रेप व्हीडीओ असे शब्द सर्च केले जात आहेत. कोलकाता रेप व्हीडीओ, डॉ. (पीडितेचे नाव) व्हीडीओ, डॉ. (पीडितेचे नाव) रेप व्हीडीओ, पीडितेचे नाव आणि व्हीडीओ असे कीवर्ड्स वापरले जात आहेत. पॉर्नसह अन्य काही कीवर्ड्सचा वापर करून कोलकात्यामधील पीडितेचा व्हीडीओ शोधण्याचा प्रयत्न होत आहे. काही कंपन्यांना यात वेब ट्रॅफिक मिळवण्याची संधी दिसत आहे. त्यामुळे त्यांनी देखील याच कीवर्ड्सचा वापर करून वेगवेगळ्या लिंक्स व मल्टीमीडिया फाईल्स शेअर केल्या आहेत.
अनेकजण या प्रकरणाचा व्हीडीओ इंटरनेटवर शोधत आहेत. ही शोधमोहीम केवळ भारतातील यूजर्सपुरती मर्यादित नाही. नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेतील यूजर्स देखील या घटनेचा व्हीडीओ शोधत आहेत, हे सर्वाधिक धक्कादायक आहे.
माजी प्रिन्सिपलच्या घरी सीबीआयचा छापा
कोलकाता बलात्कार हत्या प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीबीआयने आर. जी. कार मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्या घरावर छापा टाकला आहे. सीबीआयची एन्ट्री करप्शन ब्रँच रविवारी (२५ ऑगस्ट) कोलकाता येथे घोष आणि त्याच्याशी संबंधित लोकांच्या १५ ठिकाणांची झडती घेत आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील फॉरेन्सिक मेडिसिन आणि टॉक्सिकॉलॉजीचे प्रात्यक्षिक डॉ. देबाशिष सोम यांच्या घरीही सीबीआयचे पथक पोहोचले आहे. महाविद्यालयाचे माजी अधीक्षक अख्तर अली यांनी तीन दिवसांपूर्वी तक्रार दाखल करून भ्रष्टाचार आणि अनियमिततेचा आरोप केला होता. त्यांनीच डॉ. देबाशिष सोम यांचे नाव घेतले. सीबीआयने शनिवारी (२४ ऑगस्ट) संदीप घोष यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला होता. घोष यांच्यावर त्यांच्या कार्यकाळात वैद्यकीय महाविद्यालयात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप आहे. बंगाल सरकारने या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवला होता. मात्र, कोलकाता उच्च न्यायालयाने एसआयटीऐवजी सीबीआयला तपास करण्यास सांगितले आहे.
आरोपींची पॉलिग्राफ चाचणी केली
कोलकाता येथील महिला ट्रेनी डॉक्टरची अत्याचार केल्यानंतर हत्या झाल्याने देश सुन्न झाला आहे. या प्रकरणात सीबीआयने या प्रकरणातील आरोपी संदीप घोषसह सात लोकांची पॉलिग्राफ टेस्ट केली आहे. मुख्य आरोपी संजय रॉय याची पॉलिग्राफ टेस्ट जेलमध्ये करण्यात आली. पॉलिग्राफी टेस्ट दरम्यान आरोपीला भ्रमित करण्यासाठी काही अनावश्यक प्रश्न देखील विचारण्यात आले. पॉलिग्राफ चाचणीला लाय डिटेक्टर चाचणी देखील म्हणतात. या चाचणी दरम्यान, आरोपीच्या हृदयाचे ठोके, श्वासोच्छवासाची गती, नाडी, रक्तदाब, घाम येण्याची क्रिया यासह व्यक्तीच्या अनेक शारीरिक बदलाची नोंद प्रत्येक प्रश्नाच्या वेळी घेतली जाते. त्याआधारे ती व्यक्ती खरं बोलतेय की खोटे याची तपासणी केली जाते.