File Photo
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून तिरुपती देवस्थान व तेथील प्रसाद अर्थात लाडू चर्चेचा विषय ठरले आहेत. देवस्थानात भाविकांना प्रसाद म्हणून हे लाडू देण्यात येतात. मात्र, लाडू बनवण्यासाठी वापरण्यात आलेल्या तुपामध्ये जनावरांची चरबी आढळल्याचा खळबळजनक आरोप झाल्यानंतर त्यावर बरीच चर्चा होऊ लागली आहे. हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले असून न्यायालयात या संदर्भात सुनावणी चालू आहे. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने किमान देवांना तरी राजकारणापासून दूर ठेवा, अशी अपेक्षा आम्ही करतो, अशी टिप्पणी केली आहे.
तिरुपती देवस्थानाच्या प्रसादासंदर्भात चालू असणारा वाद राजकीय मुद्दा होऊ लागला आहे. आधी विद्यमान मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनीच आधीच्या सरकारच्या काळात प्रसादाच्या लाडूंसाठी भेसळयुक्त तूप वापरले जात होते, असा आरोप केला. त्यानंतर वायएसआरसीपी अर्थात आंध्र प्रदेशातील आधीच्या सत्ताधारी पक्षाकडून हे आरोप फेटाळण्यात आले.
त्यावरून आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण चालू झाले आहे. या संदर्भात न्यायालयाने सुनावणीदरम्यान गंभीर भाष्य केले आहे. तसेच, पुढील सुनावणी तीन तारखेला ठेवली आहे. न्यायमूर्ती बी. के. गवई व न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी चालू आहे. यावेळी न्यायालयाने किमान देवांना तरी राजकारणापासून दूर ठेवा अशी अपेक्षा आम्ही करतो, अशी टिप्पणी केली.
हा श्रद्धेचा विषय आहे. जर भेसळयुक्त तूप वापरले गेले असेल, तर ते अजिबात स्वीकारार्ह नाही, असा युक्तिवाद सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयासमोर केला. तुषार मेहता यांच्या युक्तिवादावर न्यायमूर्तींनी या संदर्भातल्या पुराव्याची मागणी केली. प्रसादाचे लाडू तयार करण्यासाठी भेसळयुक्त तूप वापरले गेले होते, याचा काय पुरावा आहे, अशी विचारणा यावेळी न्यायालयाने केली.
‘ते’ तूप वापरलेच नाही
पुराव्यादाखल प्रयोगशाळेत झालेल्या तपासणीच्या अहवालाचा संदर्भ देण्यात आला आहे. मात्र, न्यायालयाने या संदर्भात सविस्तर टिप्पणी केली आहे. प्रसादाचे लाडू तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या तुपामध्ये भेसळ असल्याचा निष्कर्ष ज्या अहवालाच्या आधारे काढण्यात आला आहे, त्या अहवालावरून असे स्पष्ट होत आहे की, अहवालासाठीचे नमुने गोळा करण्यात आलेला तुपाचा साठा प्रसाद बनवण्यासाठी वापरलाच गेलेला नाही, असे न्यायालयाने यावेळी नमूद केले.
दरम्यान, यावेळी न्यायालयाने माध्यमांमध्ये या मुद्द्यावरून चालू असणाऱ्या चर्चेवरून पक्षांना सुनावले आहे. जर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते, तर मग या संदर्भात माध्यमांकडे जाण्याची काय आवश्यकता होती, अशी विचारणा न्यायालयाने केली.
केंद्राला उत्तर देण्याचे निर्देश
सर्वोच्च न्यायालयाने यावेळी केंद्र सरकारला चौकशी प्रक्रियेसंदर्भात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथक अर्थात एसआयटीने आपला तपास पुढे चालू ठेवायचा आहे की नाही, याबाबत केंद्राला विचारणा करण्यात आली आहे. येत्या ३ ऑक्टोबर रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार असून तोपर्यंत राज्य सरकारला जैसे थे स्थिती ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
जगन्नाथ पुरी मंदिर प्रशासनाने घेतला निर्णय
तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसाद लाडूंमध्ये जशी भेसळ झाली तशी भेसळ तुपात असू नये म्हणून जे साठवून ठेवलेले तूप आहे त्याची आणि मागवल्या जाणाऱ्या तुपाची चाचणी करण्यात येणार आहे. जगन्नाथ पुरीचे जिल्हाधिकारी सिद्धार्थ शंकर यांनी सांगितले की, तुपात भेसळ केली गेल्याची जी बातमी समोर आली त्यानंतर आता आम्ही जगन्नाथ पुरी मंदिराला जे तूप पुरवले जाते त्या तुपाचीही तपासणी करणार आहोत. आम्ही याबाबत दूध संघाला कळवले आहे. जगन्नाथ पुरी हे कृष्णाचे पवित्र मंदिर आहे. लाखो भाविक या ठिकाणी येत असतात. त्यामुळे या ठिकाणी ज्या तुपाचा पुरवठा केला जातो ते शुद्ध तूपच असले पाहिजे असे आम्ही आधीच पुरवठा करणाऱ्या दूध संघाला बजावले आहे. मात्र तिरुपती मंदिर प्रसाद लाडू प्रकरणात जी माहिती समोर आली त्यानंतर आम्ही आता तूप तपासण्याचा निर्णय घेतला आहे.